भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:05 PM2021-09-21T19:05:32+5:302021-09-21T19:06:01+5:30

गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत शिखरमाथा गाठला.

Golden moments in Indian mountaineering history; Successful climb of mountaineers on the summit of Mount Manda-1 in the Himalayas | भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई

भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई

Next
ठळक मुद्देहिमालयातील केदारगंगा व्हॅलीत माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह

पुणे : माउंट मंदा-१ या ६५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्टया अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करत गिरीप्रेमीच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत गिरिप्रेमीच्या डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला.

मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांना साथ दिली. माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही पहिली भारतीय गिर्यारोहण मोहीम आहे. एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले, तर जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मोहिमेला मार्गदर्शन लाभले.

हिमालयातील केदारगंगा व्हॅलीत माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे. यापैकी माउंट मंदा-१ या शिखराची उंची ६५१० मीटर असून चढाईसाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या शिखराने बहुतांश वेळा गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे. गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी १९८९ व १९९१ असे दोनवेळा माउंट मंदा-१ या शिखरावर मोहीम आयोजित केली होती. मात्र, दोन्ही वेळा संघाला शिखर चढाईत अपयश आले होते. मात्र, तब्बल ३२ वर्षांनी गिरीप्रेमीच्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणातील कौशल्ये पणाला लावून १८ सप्टेंबरच्या सकाळी संघाने शिखर चढाई यशस्वी केली.

माउंट मंदा-१ या मोहिमेसोबतच केदारगंगा व्हॅलीत असणारे ६०४१ मीटर उंच असलेले माउंट भ्रिगु पर्वत या शिखरावर गिरिप्रेमीच्या दुसऱ्या संघाने यशस्वी चढाई केली. या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी व रोहन देसाई यांनी सहभाग घेत शिखर चढाई यशस्वी केली. माउंट मंदा-१ व भ्रिगु पर्वत या दोन्ही मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये व्हाईट मॅजिक या संस्थेने मोलाचे सहकार्य केले.

''माउंट मंदा-१ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर आहे. हे शिखर गिर्यारोहकांचे अतीव परीक्षा पाहणारे आहे. येथील शिखर चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक व शारीरिकदृष्टया अतिशय कणखर असावा लागतो. अशा आव्हानात्मक शिखरावर गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी यश मिळविले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये माउंट मंदा-१ या शिखरावर भारतीय तिरंगा फडकविण्याचे भाग्य गिरिप्रेमी संस्थेला लाभले असल्याचं जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितलं.''

Web Title: Golden moments in Indian mountaineering history; Successful climb of mountaineers on the summit of Mount Manda-1 in the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app