"लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलानं सोन्याच्या पावलानं" पुण्यात घरोघरी भक्तिभावानं गौरीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 08:38 PM2021-09-12T20:38:47+5:302021-09-12T20:38:58+5:30

थाळीसह घंटानाद करीत महिलांनी घरातील प्रत्येकांच्या सहभागाने आज आपापल्या घरी महालक्ष्मी गौरीचे उत्साहात आवाहन केले.

Gauri arrives in Pune with devotion from house to house | "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलानं सोन्याच्या पावलानं" पुण्यात घरोघरी भक्तिभावानं गौरीचं आगमन

"लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलानं सोन्याच्या पावलानं" पुण्यात घरोघरी भक्तिभावानं गौरीचं आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मीचे मुखवटे देवघरासमोर ठेवून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवण्यात आला

पुणे : "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... धनधान्याच्या, सोन्याच्या, अलंकाराच्या, पुत्रपौत्रांच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने...' अशा संवादाद्वारे गौरींचे उत्साहात आवाहन केले. अनेकांनी महालक्ष्मीच्या आवाहनासाठी मध्यान्ह मुहूर्त अर्थातच दुपारी बारा ते चार हा मुहूर्त निवडला होता. प्रवेशदारातून लक्ष्मीच्या मुखवट्याला हातात घेत महिलांनी भक्तिभावानं गौरीचं आगमन केलं. 

"लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... धनधान्याच्या, सोन्याच्या, अलंकाराच्या, पुत्रपौत्रांच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने...' अशा संवादाद्वारे थाळीसह घंटानाद करीत महिलांनी घरातील प्रत्येकांच्या सहभागाने आज आपापल्या घरी महालक्ष्मी गौरीचे उत्साहात आवाहन केले. 

गणेश चतुर्थीनंतर तीन दिवसांनी भाद्रपद सप्तमीला किंवा षष्टीला गौरी आवाहन केले जाते. शास्त्रानुसार गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर करण्याचा प्रघात असल्याने आज दुपारी आपापल्या सोयीने घरोघरी महालक्ष्मींचे आवाहन करण्यात आले. यासाठी घरोघरी गौरी आगमनानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली होती. घरातील स्वच्छतेसह दारात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दाराला आंब्याच्या फाट्याचे व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते.

प्रवेशद्वारापासून घरातील देवघरापर्यंत रांगोळीने पावले काढण्यात आली होती. त्याच पावलावरून चालत लक्ष्मी आपल्या घरी येते अशी संकल्पना याद्वारे व्यक्त करण्यात येते. अनेकांनी महालक्ष्मीच्या आवाहनासाठी दिवेलागणीचा म्हणजेच सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजताचा मुहूर्त निवडला होता. 

प्रवेशदारातून लक्ष्मीच्या मुखवट्याला हातात घेत महिलांनी "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... धनधान्याच्या, सोन्याच्या, अलंकाराच्या, पुत्रपौत्रांच्या अन्‌ गाईवासराच्या पावलाने...' अशा संवादाद्वारे गौरींचे उत्साहात आवाहन केले. या वेळी घरातील सदस्यासह बच्चेकंपनीने थाळीसह घंटानाद केला. प्रवेशदारापासून रांगोळीने काढलेल्या प्रत्येक पावलावर लक्ष्मीचा मुखवटा टेकवत घराच्या उंबरठ्यापर्यंत आणला गेला. येथे धान्याने भरलेले मापही या लक्ष्मीच्या मुखवट्याकडून ओलांडण्यात आले. यावेळी पुन्हा महिलांनी "लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलाने आली... सोन्याच्या पावलाने आली... कुणाच्या घरी आली...  यांच्या घरी आली' असा संवाद करत लक्ष्मीच्या मुखवट्यांना घरात आणले. 

लक्ष्मीचे मुखवटे देवघरासमोर ठेवून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी उपस्थित सुवासिनींना हळदी - कुंकू लावून साखर वाटण्यात आली. अनेकांच्या घरी त्यानंतर महालक्ष्मीसाठी मंडप, आरास करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अनेकांच्या घरी लक्ष्मीचे मुखवटे आणल्यानंतर लगेच आडण्या किंवा कोथळ्याद्वारे लक्ष्मी उभ्या करण्यात आल्या. त्यांचे पंचोपचारे पूजा करताना त्यांना साडी नेसवणे, दागिने परिधान करणे, पुष्पहार अर्पण करणे, आगाडा दुर्वा वाहणे, धूप, दीप, नैवेद्यासह विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या घरी प्रथेनुसार भाजीभाकरी किंवा दूधसाखर किंवा बेसनाचे लाडू असा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. 

आज दिवसभर गौरीपूजन तर गाठी घेणे उद्या साडेबारानंतर महालक्ष्मी (गौरी)चे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर भाद्रपद शुध्द अष्टमीला केले जाते. बुधवारी दिवसभर अष्टमी असल्याने गौरीपूजन दिवसभर करता येणार आहे. तर गौरी विसर्जन म्हणजेच गाठी घेण्याचा विधी मूळ नक्षत्रावर मंगळवारी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनंतर करावा लागणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ महिलांनी दिली.

Web Title: Gauri arrives in Pune with devotion from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.