लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना घातला जातोय गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:23 PM2019-11-02T12:23:32+5:302019-11-02T12:26:07+5:30

मॅट्रिमोनी वेबसाइटवरून फसवणूक :

Fruad with searching life partner for a wedding | लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना घातला जातोय गंडा

लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना घातला जातोय गंडा

Next
ठळक मुद्दे उच्चशिक्षित तरुण-तरुणींचीही होतेय आर्थिक लुबाडणूकदहा महिन्यांत नऊ तक्रार अर्जभेटवस्तूंसाठी दंड झाल्याची बतावणी

- नारायण बडगुजर 
पिंपरी : मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. यात उच्चशिक्षितांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यंदा सुमारे नऊ जणांना गंडा घातल्याच्या नऊ तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत़.
   शिक्षण आणि त्यानंतर नोकरीच्या धावपळीत बहुतांश तरुण लग्नाचा विषय टाळतात. यात महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. 'करिअर' करायचे असल्याने त्यात अडथळा येऊ नये म्हणून लग्नाच्या विषयाला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे अशा तरुण व तरुणींच्या लग्नास विलंब होतो. यातील बऱ्याच जणांचे मित्र-मैत्रीणी, भाऊ तसेच बहीण आणि नातेवाइकांमधील समवयीनांचे लग्न होऊन ते संसारात रमलेले असतात. त्यांच्याकडे पाहून आपणही आपल्यासाठी आयुष्यभराचा जोडीदार शोधावा, अशी हुरहूर लागते आणि सुयोग्य वधू किंवा वराचा शोध सुरू होतो. मात्र वय जास्त झाल्याने या शोधात अडथळा येतो. त्यामुळे मॅट्रिमोनी वेबसाइटवर नावनोंदणी केली जाते. 
    माहिती तंत्रज्ञान अर्थात 'आयटी' क्षेत्रातील तरुण व तरुणींकडून मॅट्रिमोनी वेबसाइटला पसंती दिली जाते. यातील काही तरुणी कुटुंबापासून लांब असतात. तसेच काही विधवा, घटस्फोटीत असतात. त्यामुळे यातील बहुतांश महिला मनाने एकाकी असल्याचे दिसून येतात. त्याचाच फायदा घेऊन त्यांना अनुरुप प्रोफाईल मॅट्रिमोनी वेबसाइटवरून तयार करून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. 

.......................
ज्येष्ठ नागरिकांनाही घातला जातो गंडा
    उतारवयात जोडीदाराचे निधन होणे, किंवा घटस्फोट होणे अशा विविध कारणांमुळे अनेकांना एकाकीपण येते. त्याचा फायदा घेऊन काही जण त्यांच्याशी नलाइन संपर्क साधतात. व्हाईस कॉलिंग करून किंवा सोशल मीडियाचा वापर करून चॅटिंग केले जाते. विविध कारणांनी पैशांची मागणी करून फसवणूक केली जाते.  

.........................

' एनआरआय' सांगून फसवणूक 
    अनिवासी भारतीय आहोत, असेही सांगून फसवणूक केली जाते. भारतीय नावांपैकी एका नावाचा वापर करून मॅट्रिमोनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार केले जाते. महिलांचा विश्वास संपादन केला जातो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, दागिने अशा महागड्या वस्तू भेटस्वरुपात पाठवित असल्याचे सांगून फसवणूक केली जाते.

................
भेटवस्तूंसाठी दंड झाल्याची बतावणी
    विदेशातून जोडीदाराने पाठविलेली भेटवस्तू विमानतळावर कस्टम अधिकाºयांनी ताब्यात घेतली असून, त्याचा जीएसटी, आयात शुल्क आदी भरण्याचे सांगण्यात येते. संबंधित व्यक्ती रक्कम भरते. मात्र पुन्हा विविध कर तसेच दंडाचे कारण सांगून पुन्हा आॅनलाइन पद्धतीने रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. बावधन येथे एका ४१ वर्षीय महिलेची अशाच पद्धतीने सुमारे दहा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. 

....................

दहा महिन्यांत नऊ तक्रार अर्ज
    या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत एकूण नऊ तक्रार अर्ज पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे प्राप्त झाले आहेत. त्यात मार्चमध्ये एक, एप्रिलमध्ये दोन, मेमध्ये एक, जूनमध्ये एक तर जुलैमध्ये दोन आणि त्यानंतर दोन असे एकूण नऊ तक्रार अर्ज आले होते. काही प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यात यश आले आहे. 

.......................
    मॅट्रिमोनी वेबसाईट आर्थिक व्यवहारासाठी नव्हे तर लग्न जुळविण्यासाठी आहेत. त्यामुळे त्यावरून ओळख झालेल्या व्यक्तिशी आर्थिक व्यवहार करू नये. अशा वेबसाईटवरून ओळख झालेल्या व्यक्तिने लग्नाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केल्यास त्याबाबत पोलिसांना किंवा आपल्या जवळच्या तसेच विश्वासातील व्यक्तिंना सांगितले पाहिजे.     
- सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: Fruad with searching life partner for a wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.