कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ' फ्रँकफुर्ट ' मधील साडेचार हजार मराठी बांधवांसाठी तो "कट्टा" ठरतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:19 PM2020-04-06T14:19:16+5:302020-04-06T15:28:06+5:30

"आम्ही ठीक आहोत, काळजी घेतोय, तुम्हीही घेत रहा, लवकरच भेटू"

Four and a half thousand Marathi people support each other by katta in the corona virus period | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ' फ्रँकफुर्ट ' मधील साडेचार हजार मराठी बांधवांसाठी तो "कट्टा" ठरतोय आधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ' फ्रँकफुर्ट ' मधील साडेचार हजार मराठी बांधवांसाठी तो "कट्टा" ठरतोय आधार

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशनाचा आधार

राजू इनामदार- 
पुणे: 'भेटणे, बसणे, गप्पा मारणे आणि संघटना स्थापन करणे' याची जन्मत:च ओढ असणाऱ्या मराठी बांधवांनी जर्मनीतील (फ्रँकफुर्ट) ही आवड जपली आहे. कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर "मराठी कट्टा"च्या माध्यमातून तब्बल साडेचार हजार मराठी 'जन' फेसबूक पेज चा वापर करत परस्परांचा आधार झाले आहेत.'मराठी कट्टा, जर्मनी' ही फ्रँकफुर्ट आणि परिसरातल्या साडेतीन-चार हजार मराठी लोकांना अगदी आपली वाटणारी संघटना. अजित रानडे आणि त्याच्या मित्रमंडळींनी मराठी लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, त्यांना एकत्र आणावं, आणि त्यांच्यासाठी अडीअडचणीला उपयोगी पडणारा एखादा ग्रुप असावा म्हणून काही वर्षांपूर्वी हा कट्टा सुरू केला.
गेली काही वर्षे जर्मनीत असलेले या कट्ट्याचे सदस्य ह्रषीकेश कुलकर्णी 'लोकमत' बरोबर बोलताना म्हणाले, सध्याच्या काळात अजित ने आपल्या 'देसी जर्मन्स' या खाजगी कंपनीची सर्व संसाधनं मराठी कट्ट्याच्या बरोबरीने मराठी / भारतीय लोकांना मदत करण्यासाठी झोकून दिली आहेत. जीवन करपे, अक्षय जोशी, मोहिनी काळे, सागर तिडमे, जान्हवी देशमुख, डॉ. मेघा जाधव, इंद्रनील पोळ अशी आणि इतरही अनेक उत्साही तरूण मंडळी त्याच्या बरोबरीने मैदानात उतरून गरजू लोकांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत करत आहेत. 
कुलकर्णी म्हणाले , याशिवाय आणखी काही गोष्टी इथे मराठीपणातून सुरू झाल्या आहेत. वर्क फ्रÞॉम होम मुळे आॅफीस सुटल्यावर (म्हणजे घरात कॉम्प्युटर बंद केल्यावर) करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या कॉन्सुलेट (फ्रँकफुर्ट) च्या फेसबुक  पेजवर जायचं. तिथे रोज "कनेक्ट लाईव्ह विथ सीजीआय नावाच्या कार्यक्रमात काहीतरी गंमत असतेच. कधी कोणी येऊन गोष्ट सांगतात, कधी कोणी नृत्य शिकवतात, कधी तज्ज्ञांचे सल्ले, तर कधी एखादी प्रश्नमंजूषा. भाग घ्यायला काही हजार भारतीय (आणि जर्मनसुद्धा) व्हर्चुअली एकत्र येतात. कॉन्सुल जनरल प्रतिभा पारकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमावर भारतीय एकदम खूश आहेत. एकमेकांना भेटून प्रसन्न होणार नाही तो भारतीय कसला? असा प्रश्न करून कुलकर्णी मँहणाले, "कॉन्सुलेटच्या वेबसाईटवर कोरोनाबद्दल माहिती मिळतेच, परंतु या परिसरातल्या अनेक भारतीय संस्था, मंडळं, विद्यार्थी संघटना यांचीही संपर्क माहिती एकाच ठिकाणी मिळते. जर्मनीत तशी स्थिती खूपच बरी आहे. कोणी खरंच कोरोनाने आजारी पडला तर त्याला उत्तम वैद्यकीय मदत लगेच मिळण्याची व्यवस्था आहेच. ज्यांना कोरोना झालेला नाही, परंतु इथे एकटे पडल्यामुळे भीती वाटतेय, काळजी वाटतेय, काही सुचत नाहीये, काही सल्ला हवाय, इतर काही अडचणी आहेत, असे लोक  यातल्या कुठल्या ना कुठल्या संघटनेकडे हक्काने जातात." 
आणि याची गरज पडतेच असे मत व्यक्त करून कुलकर्णी म्हणाले, "लोकांना कधीकधी शंका येतात, कधीकधी स्वत:लाच कोरोना झालाय की काय असं वाटायला लागतं. परदेशात एकटं राहाणं व तेही या परिस्थितीत आव्हानात्मकच आहे. कोणाकडे आलेल्या ज्येष्ठ आईवडिलांचा व्हिसा संपलेला असतो, पण विमानसेवा बंद असल्याने  ते परत जाऊ शकत नसतात, कोणाच्या पाहुण्यांनी भारतातून आणलेली औषधं संपलेली असतात आणि ती इथे कशी मिळवायची ते माहीत नसतं. "जॉब सीकर व्हिसा" वर आलेल्यांचे प्रश्न आणखी वेगळे. हातात नोकरी नसताना, ती मिळवण्यासाठी म्हणून आलेले धाडसी लोक असतात ते. त्यातले नोकरी अद्याप न मिळालेले, कोणी इंटर्नशिप करायला आलेले तर कोणी नुसतेच टूरिस्ट. या सगळ्यांच्या समोर व्हिसा संपल्यावर इथे अडकून पडायची वेळ आलेली आहे. अशा सर्वांना धीर द्यायचा, योग्य माहिती त्यांना द्यायची, योग्य ती सरकारी ऑफिसं, मदतगार संस्थांशी त्यांना जोडून द्यायचं अशी कामं ही मराठी कट्टेकर मंडळी अतिशय उत्साहानं करीत आहेत. 
एक अनूभव सांगताना कुलकर्णी म्हणाले, "इथे काम करणार्या एका तरूण मुलाची आई तिकडे भारतात दुर्दैवाने देवाघरी गेली. त्याच्या मन:स्थितीची कल्पना आपण करू शकतो. काहीही करून भारतात जाण्यासाठी त्याने जंग जंग पछाडले, परंतु ते केवळ अशक्य होते. त्याला या कट्टेकरी मंडळींकडून मानसिक आधार मिळाला आणि त्यानं आता स्वत:ला इतकं सावरलंय की, या काळात दु:खात सापडलेल्या इतरांना धीर द्यायला तो आता पुढे असतो. भारतीय कॉन्सुलेट कोरोनाबधित अशा इथल्या भारतीय रुग्णांची महिती तर गोळा करुन ठेवतेच, परंतु, ज्यांच्या घरात दूर भारतात अशा काही घटना घडल्या असतील, तर त्यांची सुद्धा योग्य ती महिती गोळा करून ठेवते आहे. हेतू हा, की जेव्हा एअर इंडिया पुन्हा विमान सेवा चालू करेल, तेव्हा अशा लोकांना प्राधान्य मिळण्यासाठी कॉन्सुलेट स्वत: त्यात लक्ष घालेल. 
कधीकधी एखाद्या गावात एखाद-दोनच मराठी कुटुंबं असतात), त्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून संपर्कात ठेवले जात आहे, एकटे पडू दिले जात नाही.
 फ्रँकफुर्ट, म्युनिच, बर्लिन अशा मोठमोठ्या शहरांतून असणारी सर्वच मराठी मंडळे अशा पद्धतीने काम करीत आहेत आणि आपल्या माणसांचा धीर टिकवून ठेवत आहेत. या सर्व मंडळींचा दिवस एकदम भरगच्च असतो. स्वत:ची  रोजगाराची कामे सांभाळून रोज तास-दीड तास हे लोक व्हिडीओ कॉल करून एकमेकांशी बोलतात, एकंदर परिस्थितीचा आढावा घेतात, आणि पुढे काय करायचंय ते ठरवतात. त्यांचा फोन सतत वाजत असतो, आणि फोन करणार्यांना हसतमुखानेच उत्तरे मिळतात. मग प्रश्न कितीही गंभीर असो. एका तरूण सॉफ्टवेअर अभियंत्याने फोन केला. 'ब्लू-कार्डचा अर्ज केला होता, कार्ड येणार तेवढ्यात ही भानगड आली, आणि सरकारी ऑफिसं तर बंद आहेत, भारतात जाऊही शकत नाही आणि इथे राहायची अधिकृत परवानगी नाही, काय करू?' उत्तर- घाबरू नकोस. त्या विभागातल्या जर्मन अधिकाऱ्यांशी आपले आधीच यावर बोलणे झालेले आहे, अमुक अमुक यांना ईमेल पाठव, आपल्यातल्या तमक्याचं नाव सांग- काम होईल, नाही झालं तर परत फोन कर.
एकूणच मराठी आणि भारतीय लोकांनी या परिस्थितीत धीर न सोडता एकमेकांना मदत करीत सकारात्मक राहायचं ठरवलं आहे हे स्पष्ट दिसतंय. भारतातल्या आमच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना, "आम्ही ठीक आहोत, काळजी घेतोय, तुम्हीही घेत रहा, लवकरच भेटू" असं नक्की सांगायचंय, अन्य माध्यमांबरोबरच लोकमत च्या माध्यमातून ते सांगा येत आहे याचा आनंद आहे असे ह्रषीकेश कुलकर्णी म्हणाले.   

Web Title: Four and a half thousand Marathi people support each other by katta in the corona virus period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.