गुजरातच्या 'बर्फी'वर राहणार एफडीएचे लक्ष : खासगी बस गाड्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:07 AM2019-08-29T11:07:29+5:302019-08-29T11:17:44+5:30

राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुजरातहून मोठ्या प्रमाणावर स्पेशल बर्फी येते.

FDA's focus on Gujarat's 'Barfi': Private bus will be inspection | गुजरातच्या 'बर्फी'वर राहणार एफडीएचे लक्ष : खासगी बस गाड्यांची होणार तपासणी

गुजरातच्या 'बर्फी'वर राहणार एफडीएचे लक्ष : खासगी बस गाड्यांची होणार तपासणी

Next
ठळक मुद्देपदार्थांचा दर्जा राखण्याबाबत मिठाई उत्पादकांना आवाहन दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक वातानुकुलित वाहनांतून करणे बंधनकारकतब्बल ३९ लाख ६४ हजार ४१२ रुपयांची ९६,७२२ किलो स्पेशल बर्फी जप्त

पुणे : गणेशोत्सवात निर्भेळ खाद्यान्न आणि मिठाईचे पदार्थ मिळावे यासाठी यंदा गुजरातहून येणाऱ्या स्पेशल बर्फीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष केंद्रीत केले आहे. खासगी बस स्टँडवर एफडीएची पथके पाहणी करीत असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. तसेच, मिठाई उत्पादकांना देखील पदार्थांचा दर्जा राखण्याबरोबरच स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 
राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर माव्याच्या पदार्थांचा वापर होतो. खव्याचे मोदक, बर्फी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुजरातहून मोठ्या प्रमाणावर स्पेशल बर्फी येते. नाशवंत असलेली ही बर्फी खासगी ट्रॅव्हल्स बसमधून अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणली जाते. अन्न सुरक्षा मानद कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक वातानुकुलित वाहनांतून करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यात जीवाणूंची निर्मिती होण्याचा धोका असतो. अशा माव्यापासून बनविलेले पदार्र्थ खाण्यास योग्य राहत नाहीत. 
गेल्या गणेशोत्सवामधे शहरामध्ये गुजरातमधून आलेली तब्बल ३९ लाख ६४ हजार ४१२ रुपयांची ९६,७२२ किलो स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली होती. प्रवासी ट्रॅव्हल्स गाड्यातून या पदार्थांची वाहतूक करण्यात आली होती. एफडीएने हा संपूर्ण साठा जप्त करुन नष्ट केला होता. तसेच, या बफीर्ची वाहतूक करणाºया वाहनाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. या काळात बफीर्चे २१ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील १२ नमुने खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. 
एफडीएचे सहायक आयुक्त शिंदे म्हणाले, गुजरातहून येणारी स्पेशल बर्फी तीस किलोच्या बॅग्जमधे येते. त्यात दहा-दहा किलोच्या वड्या असतात. त्यावर तुपाचा हात फिरविलेला असतो. प्रवासी वाहनांमधे अस्वच्छ वातावरणात त्याची वाहतूक केली जाते. या पदार्थांची वातानुकुलीत वाहनांतूनच वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. या पदार्थांची प्रवासी वाहनांतून वाहतूक केल्याचे आढळल्यास, ते जप्त करुन नष्ट केले जाते. तसेच, संबंधित वाहनावरही कारवाई केली जाते. 
----------------
परराज्यातून धोकादायक वातावरणात दुग्धजन्य पदार्थ येऊ नयेत यासाठी खासगी बस स्टँडवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच, मिठाई उत्पादकांना देखील पदार्थांचा दर्जा राखण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. प्रसंगी उत्पादकांच्या दुकानांची देखील तपासणी केली जाईल. 
संजय शिंदे, सहायक आयुक्त, एफडीए
  

Web Title: FDA's focus on Gujarat's 'Barfi': Private bus will be inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.