कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ; येरवडा कारागृहाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:07 PM2019-08-12T19:07:16+5:302019-08-12T19:09:19+5:30

येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येरवडा कारागृहाच्या शाेरुममध्ये भरविण्यात आले आहे.

exibition of artifacts made by prisoners ; initiative of Yerwada Prison | कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ; येरवडा कारागृहाचा उपक्रम

कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ; येरवडा कारागृहाचा उपक्रम

googlenewsNext

पुणे : शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे, शिक्षा भाेगून बाहेर पडल्यानंतर त्यांना समाजात मानाने जगता यावे तसेच त्यांच्या उपजिवीकेसाठी त्यांना एखादा व्यवसाय सुरु करता यावा यासाठी कारागृहाकडून कैद्यांना विविध प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहातील कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन कारागृहाच्या शाेरुममध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते सुबाेध भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारागृहाचे अपर पाेलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनिल रामानंद, कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, तसेच येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित हाेते. 

येरवडा कारागृह हे आशिया खंडातील सर्वात माेठे कारागृह आहे. या कारागृहात सद्यस्थितीला पाच हजाराहून अधिक कैदी शिक्षा भाेगत आहेत. शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावे, त्यांचे मन इतर कार्यात वळावे या हेतून कारागृहात विविध उपक्रम राबविले जातात. कारागृहात अनेक कारखाने असून त्यात विविध वस्तू कैद्यांमार्फत तयार केल्या जातात. यात राख्यांपासून ते साेफासेटपर्यंत सर्व घरउपयाेगी वस्तू तयार केल्या जातात. कैद्यांना देण्यात आलेल्या कामाचा माेबादला देखील त्यांना दिला जाताे. जेव्हा कैदी शिक्षा भाेगून बाहेर पडताे तेव्हा त्याला येथे देण्यात आलेल्या विविध वस्तू तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा उपयाेग हाेताे. राखी पाैर्णिमेनिमित्त खास राख्या देखील कैद्यांकडून तयार करण्यात आल्या आहेत. 

या प्रदर्शनाबाबत बाेलताना सुबाेध भावे म्हणाले, या उपक्रमाबाबत मी ऐकून हाेताे. कैद्यांनी तयार केलेली चादर माझ्या घरी आहे. आज या सर्व गाेष्टी जवळून पाहता आल्या. रंगमंचावर काम करताना कलाकार जेव्हा पहिलं वाक्य उच्चारताे तेव्हा त्याचा सूर नीट लागला आहे की नाही हे त्या कलाकाराला ही कळत असतं आणि प्रेक्षकांनाही. इथे असलेल्या कैद्यांचा एखादा सूर बेसूर लागला असेल, परंतु त्यांचा सूर सूरात लावण्याचे काम कारागृह प्रशासन करत आहे. इथल्या कैद्यांना ते उर्जा देण्याचं काम करतात. मी कैद्यांना एवढंच सांगिन तुम्ही शिक्षा भाेगली म्हणजे आयुष्य संपलं नाही. या येरवडा कारागहामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजकीय कैदी हाेते. त्यांची नावं पाहिलं तर लक्षात येईल की शिक्षा भाेगून त्यांचे काम संपले नाही तर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. तुम्ही शिक्षा भाेगली म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं नाही तर तुम्हाला आयुष्यात खूप काही करायचंय. त्याची दिशा देण्याचं काम कारागृह प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

Web Title: exibition of artifacts made by prisoners ; initiative of Yerwada Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.