Everyone's eye on an empty kasba : Most interested in BJP | रिकाम्या कसब्यावर सर्वांचाच डोळा : भाजपात सर्वाधिक इच्छुक
रिकाम्या कसब्यावर सर्वांचाच डोळा : भाजपात सर्वाधिक इच्छुक

ठळक मुद्देशिवसेनेसह काँग्रेसचीही तयारी

पुणे : कसब्यातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले गिरीश बापट खासदारपदी निवडून गेल्याने हा विधानसभा मतदारसंघ रिकामा झाला आहे. त्यामुळे भाजपासह विरोधी पक्षातील अनेकांचा कसब्यावर डोळा आहे. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे.
शहराच्या मध्यभागातील पेठा हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. आता लोकमान्य नगर, राजेंद्रनगर तसेच पर्वती पायथ्याचा काही भाग जोडला गेला आहे. शहरातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कसबा क्षेत्रफळाने कमी, मतदारसंख्येने कमी (फक्त २ लाख ९० हजार मतदार), प्रचारासाठी तुलनेने करावा लागणारा खर्च कमी, पेठांचा परिसर असल्याने परिचयाचे मतदार मात्र जास्त अशी याची वैशिष्ट्ये आहेत.
शिवसैनिकांना कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ हवा आहे. गेली अनेक वर्षे भाजपा कसब्यातून निवडून येत आहे. बापट सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत. सन १९७८ नंतर अपवाद म्हणून उल्हास काळोखे आणि वसंत थोरात यांनीच फक्त हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला आहे. उर्वरित प्रत्येक वेळी अरविंद लेले, अण्णा जोशी व सलग ५ वेळा बापट यांनी कसब्यावर भाजपाचेच शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळेच भाजपातून या मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत.
महापौर मुक्ता टिळक या सर्वात मोठ्या दावेदार आहेत. त्यानंतर हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश बीडकर, महेश लडकत या नगरसेवकांनी तर अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या माजी नगरसेवकांना उमेदवारी मागितली आहे. या सर्वांवर कडी करेल असे नाव बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांचे आहे. त्या सांगली महापालिकेच्या माजी नगरसेवक असून विवाहानंतर आता गेली २ वर्षे पुण्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. बापट यांच्या मनात आहे ते होईल की निर्णय थेट प्रदेशकडून होईल यावर भाजपाचे उमेदवारी कोणाला मिळेल हे अवलंबून आहे.
दरम्यान शिवसेनेच्या वतीने नगरसेवक विशाल धनवडे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. युती असली तरी किमान एक मतदारसंघ व तोही कसबाच शिवसेनेला द्यावा अशी जाहीर मागणीच त्यांनी केली आहे. ते याबाबत इतके आग्रही आहेत की त्यांनी मंगळवारी सायंकाळी अंगारकी चतुथीर्चा मुहुर्त साधत कसबा गणपतीचे दर्शन घेत थेट जाहीर प्रचारालाच सुरूवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघाचे दान माज्या झोळीत टाकतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, सहयोगी सदस्य असलेले नगरसेवक रविंद्र धंगेकर, लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी हेही काँग्रेसकडून हा मतदारसंघ मागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर उपाध्यक्ष असलेले अशोक राठी यांच्यासह आणखी काहीजण इच्छुक आहेत. मतदारसंघाच्या रचनेमुळे सर्वांनाच हा मतदारसंघ जिंकण्यासाठी म्हणून सोयीचा वाटत असून त्यामुळेच सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसते आहे.  

Web Title: Everyone's eye on an empty kasba : Most interested in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.