डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 09:00 PM2020-04-17T21:00:00+5:302020-04-17T21:00:02+5:30

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प

Dr. The "Bodhi Shatak" Project, which consulted poetic expressions on Babasaambedkar and Buddha | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्दे विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड

नम्रता फडणीस
पुणे: ' मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्मालो आलो. पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे उदगार आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. धर्मांतराच्या  भीमगर्जनेनंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मांतराचा साहित्य विश्वावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी अनेक कवी विविध अंगांनी शब्दबद्ध झाले..या विषयावरील 1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प बोधी नाट्य परिषदेने हाती घेतला आहे.' बोधी शतक' या नावाने आकाराला येत असलेला हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.
   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांना ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्माच्या धर्मगुरूंकडून आपल्या धर्मात येण्यासंबंधी विनंती करण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणा-या, मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणाऱ्या बौद्ध  धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मांतरानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावर  परिवर्तन घडले. गेल्या 64 वर्षात कविता कशी बदलत गेली.  याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा कवींचा  दृष्टीकोन कसा होता? म्हणजे श्रद्धा,   देवत्वच्या भावनेने  की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे  पाहिले गेले याचा शोध घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर,  बुद्ध आणि बौद्ध धर्म यांच्या विचारांच्या  काव्यात्मक अभिव्यक्तीचा धांडोळा या प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती  प्रकल्प समन्वयक आणि  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.
   ते म्हणाले, या प्रकल्पात 1956 ते 2019 पर्यंत डॉ आंबेडकर यांच्याविषयीच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहे. विशिष्ट जाती, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन कवितांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे बा.सी मर्ढेकर, राजानंद गडपायले, सुरेश भट, यशवन्त मनोहर, कवी ग्रेस यांपासून ते नंतरच्या काळातील  रवींद्र लाखे, मीनाक्षी पाटील, नीरजा, आशालता कांबळे, चेतन पिंपळापुरे अशा अनेक कवींच्या कवितांचा समावेश यात करण्यात आला आहे. कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता थेट विषयाला भिडणाऱ्या नसल्या तरी त्यांच्या विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे काम पूर्ण झाले असून, प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. एका कवितेबद्दल दोन विभिन्न प्रकारचे दृष्टीकोन असू शकतात..म्हणून दोन प्रस्तावना देण्यात येणार आहेत. टाळेबंदी हटल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल.

Web Title: Dr. The "Bodhi Shatak" Project, which consulted poetic expressions on Babasaambedkar and Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.