विविध मागण्यांसाठी राज्यातील यूपीएससी विद्यार्थ्यांची दिल्लीत निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:25 PM2020-02-18T13:25:58+5:302020-02-18T13:30:37+5:30

घोळ सारथी विद्यावेतनाचा

Demonstrations of UPSC students in Delhi for many demands | विविध मागण्यांसाठी राज्यातील यूपीएससी विद्यार्थ्यांची दिल्लीत निदर्शने

विविध मागण्यांसाठी राज्यातील यूपीएससी विद्यार्थ्यांची दिल्लीत निदर्शने

Next
ठळक मुद्देमागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन दोन दिवसांत पैसे देण्याचे विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळाले नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरमहा एक तारखेला विद्यावेतनाची रक्कम मिळावी, सारथीचा स्वायत्त दर्जा कायम ठेवावा व पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सोमवारी (दि. १७) आंदोलन केले. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले.  
 सकल मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या मूक मोर्चानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर स्वायत्त संस्थेची निर्मिती केली. त्यानुसार सारथी संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नफा न कमावणाºया सरकारी कंपनीची स्थापना केली. या संस्थेने लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमधे प्रशिक्षणाची योजना जाहीर केली. त्यानुसार ७५ मुली आणि दीडशे मुले अशा २२५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जुलै-२०१९मध्ये दिल्लीला पाठविले. विद्यार्थ्यांना दरमहा १३ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. यातून 
विद्यार्थी राहण्याचा आणि भोजनाचा खर्च भागवतात.
नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यावेतन वेळेवर दिले जात होते; परंतु डिसेंबर महिन्यात ४ ते ५ दिवस उशीर झाला. जानेवारी महिन्याचे वेतन १ फेब्रुवारीला खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, १७ दिवस उलटूनही ते जमा झालेले नाही. याविरोधात विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यावेतनात उशीर होतोय, विद्यार्थी अस्थिर...गरिबांच्या मुलांना अधिकारी होऊ द्या... सारथी एक मृगजळ असे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 
याबाबत दिल्लीमधे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा राजेश बोनवटे म्हणाला, ‘‘विद्यावेतन वेळेवर मिळत नसल्याने घरभाडे, अभ्यासिका शुल्क आणि खाणावळीचा खर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. दरमहा दोन तारखेला विद्यावेतन दिले जावे. वारंवार भाडेकरार आणि इतर कागदपत्र देण्याची मागणी करू नये. बार्टीप्रमाणेच मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारास एकरकमी २५ हजार रुपये दिले जावेत.’’ 
मंत्री वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. सारथी संस्था ही स्वायत्तच असावी. 
यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार असताना वेळेत विद्यावेतन मिळत होते. त्यानंतरही त्यांची जबाबदारी काढून अन्य अधिकाºयाकडे अतिरिक्त पदभार दिला. संस्थेला स्वायत्तता बहाल करून पूर्णवेळ अधिकाºयाची नेमणूक करावी, असे ओमकार पवार म्हणाले.  

Web Title: Demonstrations of UPSC students in Delhi for many demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.