Dealing with Google Pay, beware! | 'गुगल पे'वरून व्यवहार करताय?; एक लिंक करू शकते घात!
'गुगल पे'वरून व्यवहार करताय?; एक लिंक करू शकते घात!

- विवेक भुसे
पुणे : एका दुकानात फोन येतो, आम्हाला पाच गिटार घ्यायचे आहे, त्याचे किती पैसे होतील, याची चौकशी केली जाते़ त्यांना गुगल पे वरून पैसे पाठवितो़ तुम्ही गुगल पेची लिंक पाठवा, असे सांगितले जाते़ नेहमी असे व्यवहार न करणाऱ्या महिला ग्राहक पाच गिटार खरेदी करीत असल्याचे पाहून गुगल पेची लिंक पाठवितात़ काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढल्याचा मेसेज येतो़
दुसरीकडे फ्लिपकार्टवरून मागविलेल्या टीव्हीची डिलिव्हरी बरेच दिवस न मिळाल्याने ते कस्टमर केअरला फोन करतात़ फोन घेणारा त्यांचा विश्वास संपादन करतात़ त्यांना सर्व माहिती विचारतात़ कंपनीच्या कस्टमर केअरलाच आपण फोन केला असल्याचे वाटून ते सर्व माहिती देतात़ बोलता बोलता फोन करणारा त्यांच्या एटीएमचा सीव्हीव्ही नंबरही घेतो़ त्यानंतर त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतल्याचे समजते़
आॅनलाइन व्यवहाराची संपूर्ण माहिती नसताना अनेक जण ज्यांना कधी पाहिले नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यवहार करतात़ त्यातून त्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत़ त्यात प्रामुख्याने आॅनलाइन व्यवहार कसे होतात़ ते करताना काय काळजी घ्यावी, कोणती माहिती समोरच्याला द्यावी, कोणती माहिती अजिबात देऊ नये, याची संपूर्ण माहिती नागरिक घेत नाही़ त्यातून फसवणूक करणाऱ्यांना आपण आयती संधी देतो़ अनेकदा एखादा ग्राहक तुम्हाला पैसे पाठवितो़ तुम्ही पाठविलेल्या लिंकवर माहिती भरून पाठवा, असे सांगितले जाते़ अशा कोणत्याही लिंकवर तुमची माहिती देऊ नका़ ही लिंक संबंधित हॅकर्सची असते़ त्याद्वारे त्याला तुमच्या अकाउंटची सर्व माहिती होते व त्याद्वारे तो फसवणूक करू शकतो़
कस्टमर केअरची खात्री करा
अनेकदा लोक आपली तक्रार करण्यासाठी गुगलवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर शोधतात आणि त्यावर संपर्क करून आपली तक्रार करतात़ तो फोन घेणारा तुमचे पैसे परत करतो, असे सांगून तुमची माहिती विचारतो़ तुम्ही देतात़ त्यानंतर काही वेळाने तुम्हाला फोन येतो़ कस्टमर केअरचा नंबर पाहून तुम्ही तो घेता़ फोन करणारी व्यक्ती आपण अधिकारी असल्याचे सांगते व तुम्हाला पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगून तुमचा विश्वास संपादन करते़ तुमची गोपनीय माहिती चलाखीने काढून घेते़ त्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळत नाहीच, उलट तुमच्या खात्यातून होते नव्हते ते सर्व पैसे काढले जातात़ गुगलवर सायबर हॅकर्स अनेकदा वेगवेगळ्या कंपनीचे बनावट कस्टमर केअर नंबर टाकत असतात़ तसेच पे स्टोअरमध्ये एक अ‍ॅप येते़ ते तुम्ही डाऊनलोड केले की, तुम्ही ज्याला फोन करता त्याला तुमचा फोन नंबर न जाता कस्टमर केअर अथवा एखाद्या कंपनीच्या हेल्पलाइनसारखा दिसणारा १६ आकडी नंबर दिसतो़ फोन घेणाºयाला तो कस्टमर केअरचा नंबर वाटतो़ प्रत्यक्षात तो हॅकर्सचा असतो़
>काय काळजी घ्याल?
कोणत्याही आॅनलाइन व्यवहार करणाºया कंपन्यांकडून वस्तू मागविताना तुम्ही कॅश आॅन डिलिव्हरीच्या पर्यायाला प्राधान्य द्यावे़ त्यामुळे कंपनीची वस्तू तुम्हाला मिळालेली असते़ त्यानंतरच तुम्ही त्याची किंमत देता़
कोणी काहीही सांगितले तरी त्याला आपला गोपनीय क्रमांक कधीही शेअर करू नये़ जोपर्यंत आलेल्या कॉलची खात्री पटत नाही़ तोपर्यंत त्यांना गुगल पे अथवा अन्य पैसे पाठविण्याच्या पेमेंट अ‍ॅपवर पैसे पाठवू नये़ ते आणखी माहिती मागत असतील तर त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देतो, असे सांगावे़
एक कायम लक्षात
ठेवावे की, जोपर्यंत तुम्ही तुमचा गोपनीय क्रमांक कोणाला शेअर करत नाही अथवा पेमेंट अ‍ॅपची लिंक कोणाला पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही किमान सेफ असता हे लक्षात ठेवावे़
गुगल पे वरून व्यवहार करताना आपण ज्यांना पैसे पाठविणार असतो, किंवा ज्यांच्याकडून पैसे घेणार असतो़ त्यांना केवळ आपला फोन नंबर पाठवावा़
कोणालाही गुगल पेची लिंक पाठविण्याची गरज नसते आणि व्यवहारासाठी कोणालाही त्याची आवश्यकता नसते, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे़ तुमच्या मोबाइल नंबरवरून सर्व व्यवहार होऊ शकतात़ त्यात कोणतीही अडचण येत नाही़
आपल्या गुगल पेच्या लिंकमध्ये आपली
सर्व माहिती असते़ त्याचा उपयोग करून सायबर हॅकर्सना
आपली सर्व माहिती होते़ त्याचा उपयोग करून ते आपल्या खात्यातून पैसे इतरत्र ट्रान्सफर करून आपली फसवणूक करतात़
आपण गुगल पे वर गेला व मोबाइल क्रमांक टाकला की त्यावर ज्याचा तो मोबाइल क्रमांक असेल त्याचे संपूर्ण नाव, अकाउंट नंबर येतो़ त्याखाली तुम्हाला किती पैसे पाठवायचे ते येते़ पैसे पाठविण्यासाठी याशिवाय आणखी माहितीची गरज नसते, हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे़
>खात्री करून मगच
व्यवहार करावेत
आॅनलाइन व्यवहार करणारे सर्व गेटवे आणि प्लॅटफार्म हे खरे आहेत़ मात्र, त्याचा वापर करणारे खरे आहेत की खोटे हे ओळखणे अवघड आहे़ त्यामुळे गुगलवरून आपण माहिती घेतलेल्या कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर हॅकर्सचाही असू शकतो़ त्यामुळे हा गेटवे, प्लॅटफॉर्म वापरताना समोरचा खरा आहे, हे गृहीत न धरता, त्याची खात्री करून व्यवहार करावेत़
- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम, पुणे

Web Title: Dealing with Google Pay, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.