पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:54 PM2021-08-30T20:54:41+5:302021-08-30T20:55:26+5:30

पाच कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Corruption complaint lodged with Lokayukta against Parner Tehsildar Jyoti Deore | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल

googlenewsNext

पुणे : पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी पाच कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे सोमवारी (दि. ३०) दाखल करण्यात आली आहे.

लोकसेवक पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणा-यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे अशा विविध प्रकारे त्यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी अँड. असीम सरोदे, अँड. अजित देशपांडे आणि अँड. अक्षय देसाई यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे. देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे याचिकेसोबत दाखल करताना तक्रारदारांनी संयुक्त चौकशी समितीत विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे दाखल झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी देवरे यांनी एक ध्वनिफीत व्हायरल करून कामाच्या ठिकाणी येणारा दबाव सहन होत नसल्याने आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते.

राज्याच्या लोकायुक्त पदावर न्यायाधीश विद्याधर कानडे यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच प्रकरण आहे.  अप्पर तहसीलदार धुळे यांच्या विरोधात किशोर मोहनलाल बाफना यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित दस्तऐवज महत्त्वाचा आहे. कारण त्यातून स्पष्टपणे दिसते की, देवरे जेव्हा धुळे येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांनी नगरपालिकेच्या ४८.६५ एकर जागेबाबत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे असे अँड. सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Corruption complaint lodged with Lokayukta against Parner Tehsildar Jyoti Deore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.