coronavirus : येणारा काळ कठीण, काटकसरीची सवय करा, शरद पवार यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 03:11 PM2020-03-30T15:11:07+5:302020-03-30T15:20:19+5:30

कोरोनावर आपण विजय मिळवणारच या निर्धारात तडजोड नाही, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जनतेला दिला.

coronavirus: The time to come is difficult, make the habits of frugality, advice of Sharad Pawar BKP | coronavirus : येणारा काळ कठीण, काटकसरीची सवय करा, शरद पवार यांचा सल्ला

coronavirus : येणारा काळ कठीण, काटकसरीची सवय करा, शरद पवार यांचा सल्ला

Next

मुंबई - कोरोनामुळे आलेले हे संकट आता लगेच संपणार आहे असे समजायचं कारण नाही. आजच्या स्थितीला तोंड देवू आणि उद्याच्या स्थितीलाही तोंड देण्यासाठी उत्तमोत्तम काम करू व या सगळ्यावर आपण मात करू. कोरोनावर आपण विजय मिळवणारच या निर्धारात तडजोड नाही, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जनतेला दिला. तसेच येणाऱ्या आर्थिक संंकटाला तोंड देेण्यासाठी कटकासरीची सवय लावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. 
  
शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन आज दुसऱ्यांदा जनतेचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संवाद साधला. त्यावेळी पवार यांनी जनतेला काटकसरीचा सल्ला दिला. लॉक डाऊनमधून आपण काही शिकलो का? तर शिकलो आहे. आपल्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. भविष्यात आर्थिक संकट येणार आहे. व्यवसाय, रोजगार, शेती, व्यापार बंदचा परिणाम होणार आहे. स्वतः ला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात वैयक्तिक जीवनात आपल्याला काटकसरीने काम करायचे आहे. वायफळ खर्च टाळावा. त्याची काळजी आतापासूनच घ्यायला हवी. ती घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आर्थिक संकटातून येईल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक सूचना दिल्या. त्याला एक आठवडा झाला आहे आणि पंतप्रधानांनी मार्गदर्शन करुन दोन आठवडे झाले आहेत. त्यांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही पवार म्हणाले.
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. जमेची गोष्ट एकच आहे ती म्हणजे काही हॉस्पिटलमधून सेवा चांगली दिल्याने रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. मात्र वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचे नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करु या, असे त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील अहोरात्र मेहनत करत आहेत. राज्याचे सचिव, अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व लोक अहोरात्र कष्ट घेवून सर्वांना आधार देत आहेत या सर्वांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले.

आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन आपण करत नाही. काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे. ही वेळ आणायला नको.  बाहेर पडू नका असे सांगतानाच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. योग्य सल्ले देत आहे. मात्र मी कुणालाही भेटत नाही. योग्य ती खबरदारी घेत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

काही दवाखाने, हॉस्पिटल बंद केली आहेत. तर काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे. ही गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवसरात्र सेवा देत आहेत. अन्य डॉक्टरही काम करत आहेत परंतु काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली, हे योग्य नाही. डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नये.  दवाखान्यांचे दरवाजे बंद करु नका, असे आवाहनही पवार यांनी केले.सध्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंची अडचण आहे. राज्यातील माहिती घेतली असता मुंबई शहरात संजय शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सहकारी सोसायट्यांच्या २५ शाखा आहेत. त्या सर्व उघड्या आहेत. त्या शाखांमध्ये पुरेसा माल आहे, असे सांगतानाच त्यांचे अभिनंदन केले. शिवाय घर चालवायला लागणारे महत्त्वाचे सिलिंडर घरोघर पोचवण्याचे काम करणाऱ्यांचेही अभिनंदन शरद पवार यांनी केले.

काही जाणकारांनी सांगितले की, विकासाचा दर दोन टक्क्यांच्या खाली येणार आहे. ही गंभीर अवस्था आहे. त्यामुळे सध्या तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आपलं कुटुंब, व्यवसाय, तुमचं असलेलं क्षेत्र यामध्ये खबरदारी घ्यायची आहे. याच्या तयारीला आतापासूनच लागा, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक, स्वयंसेवी संस्था व इतर लोक संकटग्रस्त, मजुरांना अन्न धान्य व आधार देत आहेत त्यांचे अभिनंदन करतानाच या संकटाची व्याप्ती मोठी आहे. ही मदत अधिक काळ द्यावी लागणार आहे. वाड्या, वस्त्या, तांडे याकडे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी लक्ष द्यावे. भविष्यात आरोग्य शिबिरे घ्यायची आहेत. त्याचे नियोजन आतापासूनच करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

शेवटी फेसबुक पेजवर आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत, त्याची सोडवणूक करत शरद पवार यांनी मोलाचे सल्लेही जनतेला दिले.

Web Title: coronavirus: The time to come is difficult, make the habits of frugality, advice of Sharad Pawar BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.