CoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 12:20 PM2020-09-27T12:20:39+5:302020-09-27T12:21:01+5:30

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यापासून सुरू झालेली ही लढाई सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. दिवसागणिक त्याची तीव्रता वाढत गेली आहे.

CoronaVirus News: 'Women Commander' in the fight against Kovid; Responsibilities are met competently | CoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या 

CoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या 

Next

पुणे : कोरोनाचा काळ सर्वांचीच कसोटी पाहणारा आहे. या लढाईमध्ये काही प्रमुख 'महिला सेनापती' अगदी सुरुवातीपासून लढत आहेत. पालिकेच्या एकमेव महिला अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह सहायक आरोग्य अधिकारी म्हणून चार 'हिरकणी' सक्षमपणे काम करीत आहेत. विलगिकरण कक्ष-कोविड सेंटरच्या उभारणीपासून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, खाटांचे व्यवस्थापन, दैनंदिन अहवालापासून जम्बोच्या उभारणीपर्यंत समर्थपणे धडाडीने या महिलांनी काम केले आहे. 

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यापासून सुरू झालेली ही लढाई सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. दिवसागणिक त्याची तीव्रता वाढत गेली आहे. या काळात आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढविणे, शासनाच्या निर्देशांप्रमाणे काम करणे, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या अधिकाऱ्यांनी केले. शहराच्या विविध भागात विलगिकरण कक्ष उभारणे, रुग्णसंख्या वाढत गेली तसतसे कोविड सेंटर उभारणे, औषधांची खरेदी असो की रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करणे असो या सर्व कामाच्या केंद्रस्थानी पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले अतिरिक्त आयुक्त कार्यालय होते. कोविडच्या व्यवस्थापनामध्ये कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी घेतली जात होती. पालिकेच्या आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत असताना त्यांच्यामधील उत्साह वाढविणे आणि कोरोनासाठी काम करायला प्रवृत्त करण्यातही या महिला अधिकारी यशस्वी ठरल्या. प्रशासकीय कामाचा अनुभव उपयोगी ठरला. 

पालिकेच्या आरोग्य विभागाला एक आरोग्य प्रमुख आणि पाच सहायक आरोग्य प्रमुख आहेत. या पाचपैकी चार सहायक प्रमुख महिलाच आहेत. डॉ. वैशाली जाधव, डॉ. अंजली साबणे, डॉ. कल्पना बळीवंत, डॉ. मनीषा नाईक या महिला अधिकारी पुरुषांच्या तोडीसतोड काम करीत आहेत. दैनंदिन अहवाल तयार करून तो शासनाच्या विविध यंत्रणांना पाठविणे, विविध कोविड सेंटरची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणे, मनुष्यबळाची उपलब्धता करणे, मृतदेह व्यवस्थापन, जनजागृती, खाटांचे व्यवस्थापन आदी कामे या चौघीजणी करीत आहेत. दिवसभराचा कामाचा ताण सहन करून घरी गेल्यानंतरही रात्री बेरात्री येणारे फोन उचलणे, अडचणी सोडविणे २४ तास स्वतःला सिद्ध ठेवणे अवघड काम आहे. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून या 'हिरकणी' आपले कर्तव्य बजावीत आहेत. 
------ 
एका रुग्णापासून सुरू झालेला कोरोनाचा शहरातील प्रवास आज सव्वालाखाच्या पुढे गेला आहे. याकाळात अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करीत आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी शहरात 'इन्फ्रास्ट्रक्चर' उभे करण्यात मोलाची भूमिका बजावली. आजही उपमुख्यमंत्री घेत असलेल्या दर आठवड्याच्या बैठकीत त्या एकमेव महिला आयएएस अधिकारी असतात. घरी लहान मुलगा असतानाही त्या 'फिल्ड'वर अधिक वेळ असतात. मुलाला आणि पतीला वेळ देता येत नसल्याची खंत असली तरी तक्रार नाही. खासगी रुग्णालयांसोबत करारनामे करून तेथे कोविडचे उपचार सुरू करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. अनेक खासगी रुग्णालयांना आणि लॅबला त्यांनी कारवाईचा दणकाही दिला. जम्बो रुग्णालयात सुरुवातीला झालेला गोंधळ त्यांनी दूर करीत तेथील व्यवस्थापनच बदलून दाखविले. अवघ्या काही दिवसातच ४०० च्या क्षमतेने हे रुग्णालय काम करू लागले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात फिरण्यापासून ते रुग्णांना भेटून आपुलकीने चौकशी करण्यापर्यंत हरतऱ्हेची कामे त्यांनी केली आहेत. कोविडच्या लढाईत त्या चर्चेतल्या 'सेनापती' ठरल्या. 
---------
 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यापासून मी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सांभाळत आहे. कोंढवा आणि बाणेर कोविड सेंटरची जबाबदारीही आहे. २५-३० प्रकारचे दैनंदिन अहवाल तयार करून ते शासनाच्या विविध यंत्रणांना पाठवावे लागतात. पालिकेच्या सेवेत १८ वर्ष झाली. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कुटुंबिय कायमच पाठीशी असतात. जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य आम्ही सर्वच पार पाडतोय. ही लढाई सर्वांच्या सोबतीनेच जिंकणे शक्य आहे. 
- डॉ. वैशाली जाधव (सहायक आरोग्य प्रमुख) 
---------- 
खासगी रुग्णालयांसोबत कारारानामे करून खाटा उपलब्ध करून घेण्यासोबतच मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे, कमला नेहरू रुग्णालयातील टेलीमेडिसिन सुविधा सुरू करणे, थर्मामिटर-ऑक्सिमिटर उपलब्ध करणे, लायगुडे रुग्णालयात कोरोना वॉर्ड सुरू करणे ही कामे सुरुवातीच्या काळात केली. रॅपिड अँटिजेन किटची खरेदी, सीएसआरमधून विविध प्रकारचे साहित्य गोळा करण्याचे कामही करीत आहे. जम्बो रुग्णालयाच्या सुपरव्हीजनची जबाबादरी माझ्याकडे होती. वरिष्ठांचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. 
- डॉ. अंजली साबणे (सहायक आरोग्य प्रमुख) 
---------- 
नैमित्यिक कामांसोबतच कोविडची जबाबदारी प्रशासनाने दिलेली आहे. मृतदेह व्यवस्थापन, स्मशानभूमी व्यवस्थापन, जनजागृती आणि 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' याचेही काम सध्या मी सांभाळत आहे. यासोबतच लायगुडे आणि खेडेकर कोविड सेंटरची अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर आहे. माझे पती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात कोरोनाचेच काम करीत आहेत. 
- डॉ. कल्पना बळीवंत (सहायक आरोग्य प्रमुख) 
--------- 
कोरोना आल्यापासून खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाशी बोलून त्यांना कोविड रुग्ण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम केले. यासंदर्भात वारंवार बैठका घेतल्या. आज ही संख्या ८० ल्हासगी रुग्णालयांवर गेली आहे. खाटांच्या व्यवस्थापनासह बिल व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आतापर्यंत आम्ही दीड कोटींची बिले कमी केली आहेत. रुग्णालयांनी व्हेंटिलेटरच्या खाटा पालिकेला वाढवून देण्याविषयी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. मनीषा नाईक (सहायक आरोग्य प्रमुख)

Web Title: CoronaVirus News: 'Women Commander' in the fight against Kovid; Responsibilities are met competently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.