Corona virus : पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे २५० व्हेंटिलेटरची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 07:01 PM2020-09-29T19:01:27+5:302020-09-29T19:01:39+5:30

भविष्यातील संभाव्य रुग्ण वाढ पाहता तयारी...

Corona virus : Pune Municipal Corporation demands 250 ventilators from the state government | Corona virus : पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे २५० व्हेंटिलेटरची मागणी

Corona virus : पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे २५० व्हेंटिलेटरची मागणी

Next
ठळक मुद्देविक्रम कुमार यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांना पाठविले पत्र

पुणे : शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजमितीस पुणे शहरातील एकूण रूग्णांपैकी खासगी रुग्णालयात सर्वाधिक उपचार केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने राज्य शासनाकडे २५० व्हेंटिलेटर मशीनची मागणी केली असून या मशीन पीएम केअर फंडामधून पुरविण्यात याव्यात असे पत्र पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे.

पालिका हद्दीत सध्या कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा आणि संपूर्ण मनुष्यबळ या परिस्थितीचा यथाशक्ती मुकाबला करीत आहेत. कोविड विरूद्ध लढा देण्यासाठी सर्व संभाव्य सुविधांचा विस्तार केला जात आहे. रुग्ण वाढत असतानाच गंभीर रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या रूग्णांवर उपचार करण्यासाठी इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या काळात या खाटा उपलब्ध करून घेण्यासाठी पालिकेला प्रचंड कसरत करावी लागली.

पालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ८००  खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभे केलेले आहे. औंध- बाणेर येथील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्येही ३१४ बेड उपलब्ध करण्यात आले आहेते. या दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आऊटसोर्स करण्यात आली असून खासगी एजन्सी मार्फत सेवा दिली जात आहे.

पालिका क्षेत्रातील बहुतेक रुग्णांचा भार खाजगी रुणालयांवर असल्याचे दिसते आहे. पुण्यातील एकूण रूग्णांपैकी ५ हजार २५६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये १ हजार ७९८ नॉन ऑक्सिजन बेड, २ हजार ७५५ ऑक्सिजन बेड, ३५० आयसीयू बेड आणि ३५० व्हेंटिलेटरचा समावेश आहे.

गंभीर रुग्णांचा कल खासगी रुग्णालयात दाखल होण्याकडे अधिक आहे. गंभीर रूग्णांची संख्या वाढत चालली असून या रूग्णांसाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. ही गरज भागविण्यासाठी पालिकेला 'पीएम केअर' फंडामधून २५० व्हेंटिलेटर मिळावेत असे पालिकेने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे व्हेंटिलेटर मिळाल्यास गंभीर रुग्णांना त्याचा फायदा होईल.

--------

पीएम केअर फंडामधून मिळालेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना भाडेतत्वावर देण्याचा विचार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर ते पुन्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात येतील असेही पालिकेने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Corona virus : Pune Municipal Corporation demands 250 ventilators from the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.