Corona Virus: पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 05:26 AM2020-03-11T05:26:55+5:302020-03-11T15:47:54+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Corona Virus: Disaster Management Act applies in Pune district; Order of the Collector | Corona Virus: पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Corona Virus: पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next

पुणे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री केली.
दुबईहून आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर पुणे पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या दाम्पत्याची मुलगी, सहप्रवासी आणि त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन आलेल्या कॅब चालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे.

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात राहणारे हे दाम्पत्य जगभ्रमंतीवर गेले होते. त्यांच्यासोबत आणखी ४० सह प्रवासी होते. हे दाम्पत्य दुबईहून विमानाने १ मार्च रोजी मुंबईला आले. तेथून कॅबमधून ते पुण्याला आले. यातील पुरुषाला ताप आल्यानंतर त्रास जाणवू लागल्यावर केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांची मुलगी, मुलगा आणि मुंबईहून त्यांना घेऊन आलेल्या कॅब चालकाची तपासणी करण्यात आली. या अहवालामध्ये मुलगी आणि चालकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. मुलामध्ये अद्याप ही लक्षणे दिसलेली नाहीत. या दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यासोबत विमानामधून प्रवास केलेला एक सहप्रवासीसुद्धा कोरोनाबाधित असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

दाम्पत्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तपासणीत त्यांची मुलगी व त्यांना पुण्याला कॅबमधून आणलेल्या चालकाची तपासणी पॉझिटिव्ह आल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांबाबत काय निर्णय घ्यावा, यावर बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताप आला आणि....
बाधित दाम्पत्य १ मार्च रोजी दुबईहून मुंबईमध्ये आले. मुंबईमधून कॅबने पुण्याला आले. यातील पुरुषाला २ मार्च रोजी ताप आला. त्यांनी औषधे घेतल्यावर बरे वाटले. मात्र पुन्हा ताप व अंगदुखीचा त्रास झाला. औषधे घेण्यासोबतच त्यांनी मित्राच्या सल्ल्याने रक्त तपासून घेतले. त्या वेळी रिपोर्ट नॉर्मल आले. दोन दिवस बरे वाटल्यावर पुन्हा ताप आला. त्यांनी पुन्हा रक्त तपासणी केली. या तपासणीत मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली.

Web Title: Corona Virus: Disaster Management Act applies in Pune district; Order of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.