Corona Virus : कडक सॅल्यूट! पुण्यातील कोरोनाचा भार‘हिरकणीं’च्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 12:20 PM2020-09-25T12:20:39+5:302020-09-25T12:21:09+5:30

कोरोना रुग्णांची आईच्या मायेने सेवा करणाऱ्या या ‘हिरकणी’ आघाडीवर कोरोनाशी लढा देत आहेत.

Corona Virus : The burden of the corona in Pune falls on the shoulders of 'Hirkani' women | Corona Virus : कडक सॅल्यूट! पुण्यातील कोरोनाचा भार‘हिरकणीं’च्या खांद्यावर

Corona Virus : कडक सॅल्यूट! पुण्यातील कोरोनाचा भार‘हिरकणीं’च्या खांद्यावर

Next
ठळक मुद्देपालिकेच्या चौदापैकी दहा कोविड सेंटरवर महिला अधिकारी

लक्ष्मण मोरे; 
 पुणे :  ‘आई... आमच्या वाढदिवसाला आम्हाला कोणतेही गिफ्ट नको. पण, एक दिवस... फक्त एक दिवस आमच्या सोबत रहा ना. तु किती दिवस आम्हाला जवळ घेतलं नाहीस.’ ही आर्त हाक आहे पालिकेच्या कोविड सेंटरवर काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या चिमुकल्यांची. काळजाचा ठाव घेणारे हे  शब्द ऐकून डोळ्यात टचकन पाणी उभे राहिल्यावरही ही माऊली कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी धाव घेते. अशा एक नाही तर तब्बल दहा महिला डॉक्टर अधिकारी पालिकेच्या दहा कोविड सेंटरची धुरा वाहात आहेत. कोरोना रुग्णांची आईच्या मायेने सेवा करणाऱ्या या  ‘हिरकणी’ आघाडीवर कोरोनाशी लढा देत आहेत.
पुणे महानगरपालिकेने शहरात एकूण चौदा कोविड सेंटर उभारलेले आहेत. या चौदा सेंटरपैकी दहा सेंटरवर महिला डॉक्टर अधिकारी काम करीत आहेत. यामध्ये अवघ्या ५० खाटांच्या सेंटरपासून ते १२०० खाटांच्या सेंटरपर्यंतचा समावेश आहे. आपल्या कुटुंबाच्या पाठबळावर आणि सेंटरमधील नर्स व अन्य वैद्यकीय कर्मचा-यांच्या सोबतीने या हिरकणींनी आजवर हजारो कोरोना बाधित रुग्णांना ठणठणीत बरे करुन घरी धाडले आहे. एकीकडे रुग्णांना बरे करण्याचे असलेले आव्हान आणि दुसरीकडे आपल्यामुळे कुटुंबियांना बाधा होऊ नये याची असलेली धास्ती, वरिष्ठांच्या अपेक्षा, राजकीय अपेक्षा आणि दबाव अशा अनेक आघाड्यांवर काम करतानाच या महिला डॉक्टरांसमोर स्वत:चे मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे सुद्धा एक आव्हानच आहे. घरी वेळ देता येत नाही की स्वत:साठी वेळ काढता येत नाही.
कोरोनामुक्त झाल्यावर नागरिकांच्या डोळ्यात समाधानाचे तरळत असलेले अश्रू आणि चेह-यावरील हास्य हेच आमच्या कामाचे बळ असल्याचे या महिला डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. या भयग्रस्त परिस्थितीमध्ये एकमेकांच्या मदतीचीही अपेक्षा करणे फोल ठरत असतानाच आपले कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून ‘फ्रंटफुट’वर या महिला लढत आहेत.
=====
संसार सांभाळून रुग्ण सेवा
आपले संसार सांभाळून कोविड सेंटरवर काम करणे आव्हानात्मक आहे. कोणाच्या घरी वयोवृद्ध सासू सासरे आहेत. तर, कोणाच्या घरी ८०-९० वर्षांचे आईवडील आहेत. कोणाची लहान बाळे आहेत, तर कोणाची शाळकरी मुले आहेत. आपल्या मुलांप्रती असलेली आईची माया कर्तव्याच्या आड येऊ न देता काम करणाऱ्या या हिरकणींपैकी अनेकींनी गेल्या पाच सहा महिन्यात एकही रजा घेतलेली नाही.
====
कोविड सेंटरसाठी दिवसातील बारा ते सोळा तास काम करावे लागते. एकदा पीपीई कीट् घातले की ते दोन तीन तास काढता येत नाही. परिस्थितीत ना कुटुंबियांशी संपर्क होत ना कोणाशी फोनवर बोलता येत. परंतू, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि डॉक्टर म्हणून असलेले कर्तव्य याची पूर्ण जाणिव कुटुंबियांनाही आहे. पती, सासू-सासरे, आईवडील आणि मुले यांनी कधीही याबाबत तक्रार केली नाही, तर कायम कामाचा उत्साह वाढविला आहे.
====
ही सेवेची संधी
शहरातील पहिले कोविड सेंटर असलेल्या मुरलीधर लायगुडे दवाखान्यात मी काम करते आहे. कोरोनामुळे कामाचा ताण वाढला असला तरी ही आमच्यासाठी सेवेची संधी आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि कर्तव्याची जाणिव यामुळे काम करणे अवघड जात नाही.
- डॉ. शुभांगी शहा (मुरलीधर लायगुडे दवाखाना, धायरी)
====
शहरात कोरोना आल्यापासून मी येथे काम करते आहे. घरी छोटी मुले आहेत. त्यांनी वाढदिवसाला गिफ्ट नको पण आमच्यासोबत एक दिवस रहा अशी मागणी केली. आई म्हणून मला हेलावणारे हे शब्द होते. परंतू,  या परिस्थितीत वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्य अधिक महत्वाचे आहे.
- डॉ. स्वाती बढिये (द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालय, बोपोडी)
====
कुटुंबियांना वेळ देता यावा याकरिता मी वेळेचे नियोजन केले आहे. कौटुंबिक पाठिंबा असून कुटुंबिय समजून घेतात. कोरोना रुग्णांकडून सकारात्मक आणि उत्साह वाढविणारा प्रतिसाद मिळतो. कामाचा ताण असला तरी रुग्ण बरा झाल्यावर हा ताण निघून जातो.
- डॉ. स्वाती घनवट (कै. रामचंद्र बनकर शाळा, हडपसर)
====
मी गेली अनेक वर्षे प्रसुतीगृहात काम करते आहे. डॉ. दळवी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु झाल्यापासून हे काम करीत आहे. स्वत:साठी वेळ देता येत नसला तरी पुणेकर नागरिक हेच माझे कुटुंबिय आहेत. त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी काम करीत राहणे हे माझे कर्तव्य आहे.
- डॉ. रेखा कोकार्डे (डॉ. दळवी रुग्णालय, शिवाजीनगर)
====
कोरोनाच्या लढाईत कुटुंबियांचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि नर्स, वैद्यकीय मनुष्यबळाच्या मदतीशिवाय काम करणे शक्य नाही. हे सर्वच कोरोना योध्दे आहेत. माझे पती दवाखान्यात होते. कुटुंबाला वेळ देता येत नसला तरी रुग्णांच्या सेवेला अधिक प्राधान्य देते आहे. नकारात्मकता येऊ न देता उत्साहाने आम्ही काम करतोय.
- डॉ. दीप्ती बच्छाव (सिंहगड होस्टेल, कोंढवा)
====
मे पासून मी कोविडचे काम करीत आहे. घरी 86 वर्षींची आई आहे. माझा मुलगा नवले रुग्णालयात कोविडचेच काम करतोय याचा अभिमान वाटतो. आईची काळजी घ्यायला कोणी नाही. परंतू, आजवर एकही रजा न घेता काम करते आहे. जागरण आणि तणावामुळे शरीरातील साखर वाढली आहे. काम आव्हानात्मक आहे, पण अशक्य नक्कीच नाही.
- डॉ. इंदिरा वाघ (ट्रिनिटी कॉलेज, येवलेवाडी)
====
पाच महिन्यांपासून सतत कोरोनाचेच काम सुरु आहे. ९० वर्षांपर्यंतचे रुग्ण आमच्या सेंटरमधून बरे होऊन गेलेत. सेंटरवरील सर्व स्टाफ आणि कुटुंबाचा पाठिंबा याशिवाय चांगले काम करणे शक्य नाही. ताण जाणवत असला तरी या कामामुळे मला आंतरिक समाधान मिळते.
- सीमा मुंगळे (सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव बुद्रुक)
====
कोरोनाची भिती कमी व्हायला हवी. मी यापुर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कोविड सेंटरवर पाच महिने काम केले आहे. आता माझी नियुक्ती जम्बो सेंटरवर करण्यात आली आहे. घरी पती, मुलगी आणि मुलगा आहेत. या सर्वांनी मला समजून घेतले आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कामात सहभाग असतो. या कामाकरिता समाजातील प्रत्येक घटकाने समोर यायला हवे.
- डॉ. वसुंधरा पाटील (जम्बो कोविड सेंटर, शिवाजीनगर)
====
कोरोना रुग्णांची सुरक्षा, त्यांच्यावरील उपचार यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. सलग पाच महिने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. वैद्यकीय सेवा हे आमचे कर्तव्य आहे. पुण्यातील सद्यस्थिती पाहता वैयक्तिक सुखापेक्षा लोकांच्या सुरक्षेचा अधिक विचार केला पाहिजे.
-  डॉ. नीता चिटणीस (बालेवाडी क्रीडा संकुल)
====
शहरातील सद्यस्थिती पाहता कोरोना रुग्णांची संख्याही वाढते आहे. या परिस्थितीत सतत काम करण्याशिवाय पर्याय नाही. मार्चपासून मी सलग कोरोना ड्युटी करीत आहे. घरी आईवडील आहेत. ते दोघेही डॉक्टर असल्याने त्यांना माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणिव आहे. त्यांचा पाठिंबा आहेच. यासोबतच वरिष्ठही कामाचा उत्साह वाढवित असतात. दक्षता घेणे आणि कर्तव्यात कमी न पडणे ही माझी धारणा आहे.
- डॉ. रिध्दी कुलकर्णी (मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय, वारजे)

Web Title: Corona Virus : The burden of the corona in Pune falls on the shoulders of 'Hirkani' women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.