'कोरोना सेल' ने उंचावले पोलिसांचे मनोधैर्य;पिंपरी शहरातील २६९ पैकी २१४ पोलीस कोरोनामुक्त   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:24 AM2020-08-26T11:24:09+5:302020-08-26T11:38:58+5:30

पोलीस कोरोनाला हरवत असून, सुदैवाने शहरातील एकही पोलीस कोरोनामुळे दगावलेला नाही. 

'Corona cell' boosts police morale; 214 out of 269 police corona free in the city | 'कोरोना सेल' ने उंचावले पोलिसांचे मनोधैर्य;पिंपरी शहरातील २६९ पैकी २१४ पोलीस कोरोनामुक्त   

'कोरोना सेल' ने उंचावले पोलिसांचे मनोधैर्य;पिंपरी शहरातील २६९ पैकी २१४ पोलीस कोरोनामुक्त   

Next
ठळक मुद्देप्रतिबंध, तपासणी, उपचार व समन्वय, संपर्क अशा चारसूत्री पद्धतीने आयुक्तालयाच्या वतीने कामकाज सुरू प्रतिबंध म्हणून पोलिसांना दररोज खबरदारी घेण्याबाबत अध्यादेशव्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती, रोगप्रतिकारक शक्तीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे

नारायण बडगुजर
पिंपरी : राज्यभरात १४ हजारापर्यंत पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १३५ पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आतापर्यंत २६९ जण कोरोना पॉझिटिव्ह असून, त्यातील २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५५ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. शहर पोलीस दलाच्या कोरोना सेलतर्फे प्रत्येक रुग्णाचे मनोधैर्य उंचावण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस कोरोनाला हरवत असून, सुदैवाने शहरातील एकही पोलीस कोरोनामुळे दगावलेला नाही. 

पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात १५ मे रोजी कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर यात भर पडली. वाहने रस्त्यावर आल्याने तसेच नागरिकांशी थेट संपर्क आल्याने पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले. त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे उपाययोजना करण्यात आल्या. प्रतिबंध, तपासणी, उपचार व समन्वय, संपर्क अशा चारसूत्री पद्धतीने आयुक्तालयाच्या वतीने कामकाज सुरू झाले. त्यासाठी आयुक्तालयांतर्गत पोलिसांसाठी कोरोना सेल स्थापन करण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेल कार्यान्वित झाला. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, दोन सहायक निरीक्षक तसेच सात कर्मचारी यांच्याकडे या सेलची जबाबदारी सोपविण्यात आली. 
प्रतिबंध म्हणून पोलिसांना दररोज खबरदारी घेण्याबाबत अध्यादेश काढण्यात येत आहे. पोलिसांना मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर यासहर सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली. नियमित व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती राखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे उपलब्ध करून दिली. तपासणी म्हणून काही लक्षणे दिसून आल्यास पोलिसांची कोरोना चाचणी करण्यावर भर दिला. त्यासाठी दोन खासगी रुग्णालयांमध्ये मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली. 
उपचार पद्धतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, लक्षणे असलेले व नसलेले, तसेच गंभीर व अतिगंभीर, पूर्वीचे आजार असलेले व नसलेले अशी वर्गवारी करण्यावर भर दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार दिले. अतिगंभीर रुग्णांसाठी मुंबई, तसेच देशभरातून औषधे उपलब्ध करून दिली. प्लाझ्मा आदी थेरपींचा वापर होत आहे. 

समन्वय व संपर्क राखत कोरोना सेलकडून पॉझिटिव्ह रुग्णांशी फोनवरून चर्चा केली जाते. त्यांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविले जाते. त्यासाठी व्हिडीओ कॉलवरून थेट संवाद साधला जातो. त्यामुळे संबंधित रुग्णाला एकाकीपण जाणवत नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भावनिक संवाद साधल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावते. यासाठी कोरोना सेलमधील प्रत्येक जण सातत्याने प्रयत्नरत असतो. तसेच पॉझिटिव्ह पोलिसांच्या कुटुंबियांशी दररोज संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात. त्यांना देखील धीर दिला जातो. त्यामुळे सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते. यात सातत्य राहण्यासाठी समन्वय राखला जातो. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई कोरोना सेलकडून दैनंदिन आढावा घेतात. तसेच अतिगंभीर असलेल्या रुग्णांबाबत माहिती घेतात. संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून सूचना करतात. 

..............................

पहिल्या टप्प्यातील कार्य महत्त्वपूर्ण
पोलिसांच्या कोरोना सेलने स्थापनेनंतर पहिल्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. तबलिगींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे सर्व्हेक्षण करणे, तसेच गावी जाणाऱ्या मजूर व कामगारांची यादी तयार करणे आदी कामे या सेलने केली. नाकाबंदी व बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना चहापाणी, जेवण आदींची व्यवस्था करणे, त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील सेलने पार पाडली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविणे, त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. 

................................

कोरोना फायटर ग्रुप
कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांचा 'कोरोना फायटर' या नावाने व्हॉटस ग्रुप कोरोना सेलतर्फे तयार करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह पोलिसांना यात सहभागी केले जाते. त्यांचे अनुभव व अडचणी पोलीस या ग्रुपवर मांडतात. तसेच कोरोनामुक्त झालेले पोलीस देखील त्यांचे अनुभव मांडून कोरोनाचा कशा पद्धतीने मुकाबला केला, याबाबत मुक्तपणे मत व्यक्त करतात. त्यामुळे इतर पॉझिटिव्ह पोलिसांना धीर मिळतो. तसेच वरिष्ठ अधिकारी देखील या ग्रुपवरून वेळोवेळी मार्गदर्शन करतात. 

..........................

कोरोनावर मात करता येते. मात्र अनेक जण कोरोना तपासणी करण्याबाबत उदासीन असतात. तसेच कोरोनाची अवास्तव भिती बाळगतात. असे न करता घाबरून न जाता वेळीच तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत.   
- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: 'Corona cell' boosts police morale; 214 out of 269 police corona free in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.