रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 09:16 PM2019-08-10T21:16:17+5:302019-08-10T21:18:40+5:30

रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत.

Confirmed tickets for canceled trains ; traveller get more confused | रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप 

रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप 

googlenewsNext

पुणे : रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्याचप्रमाणे रद्द केलेल्या काही गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेची यंत्रणा अद्ययावत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 


पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस दि. १६  ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांबपल्याच्या गाड्याही रद्द झाल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. या गाड्यांसाठी प्रवाशांनी काही दिवस आधीपासून आरक्षण केले आहे. अनेक प्रवाशांचे तिकीट निश्चित झालेले नाही. गाडी सुटण्याच्या वेळेच्या चार तास आधीपर्यंत हे तिकीट निश्चित होते. पण प्रतिक्षायादी प्रवाशांची संख्या जास्त असल्यास तिकीट निश्चित होत नाही. तर गाडी रद्द केल्यानंतर आरक्षण झालेले व प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांची तिकीटे आपोआप रद्द होतात. पण मागील काही दिवसांत रद्द झालेल्या गाड्यांचे आरक्षण निश्चित झाले असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. 


पुण्यातील अ‍ॅड. आशुतोष रानडे यांनी दि. ५  ऑगस्ट  रोजी पुण्यातून सुटणाऱ्या  दि. १५  ऑगस्ट रोजीच्या इंटरसिटी एक्सप्रेसची तीन तिकीटे काढली होती. त्यावेळी प्रतिक्षायादी ३ ते ५ या क्रमांकावर तिकीटे होती. या कालावधीत रेल्वेकडून केवळ एक-एक दिवसासाठी गाडी रद्द केली जात होती. दि. ८   ऑगस्टला ही गाडी ११ तारखेपर्यंत रद्द करण्यात आली. त्यामुळे तिकीट निश्चित होतील, अशी अपेक्षा होती. पण रेल्वेने दि. ९  ऑगस्ट  रोजी ही गाडी दि. १६  ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे तिकीटे आपोआप रद्द झाली असतील, अशी अपेक्षा रानडे यांना होती. पण प्रत्यक्षात शनिवारी सकाळी तिनही तिकीटे निश्चित झाल्याचा संदेश त्यांना आला. ‘रद्द झालेल्या गाडीचे आरक्षण झाल्याने आयआरसीटीसीच्या ढिसाळ कामाचा अनुभव आला. इतर प्रवाशांनाही असे संदेश आले असतील. त्यातील काही प्रवासी त्यादिवशी येऊ शकतात. त्यामुळे यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत असावी,’ अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.

गाडी रद्द झाल्यानंतर प्रवाशांना तसे संदेश जातात. तसेच संकेतस्थळावरही तातडीने गाडी रद्दबाबत माहिती अद्ययावत होते. काही तांत्रिक कारणांमुळे या बाबी अद्ययावत झाल्या नसाव्यात. आरक्षण निश्चित झाले असले तरी संबंधित प्रवाशांना रद्दचे संदेश जातील. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

संकेतस्थळ नाही अद्ययावत
इंटरसिटी एक्सप्रेस (१२१२७) दि. १६ ऑगस्टपर्यंत रद्द असली तरी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ही गाडी दि. १४   ऑगस्टपर्यंतच रद्द असल्याचे दाखविण्यात आले आहे. दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी या गाडीच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. पण अद्याप प्रगती व डेक्कन एक्सप्रेस अधिकृतपणे रद्द केली नसल्याचे रेल्वेच्या संकेतस्थळावर दिसत आहे. या दोन्ही गाड्या आरक्षणासाठी दि. १६ तारखेपर्यंत उपलब्ध असल्याचे दिसत होते. त्यामुळे प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करू शकतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

Web Title: Confirmed tickets for canceled trains ; traveller get more confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.