राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 20:40 IST2025-12-09T20:38:43+5:302025-12-09T20:40:05+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठयाची स्थिती कायम असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे

राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
पुणे : राज्यात डिसेंबरच्या दुस-या आठवड्यातच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हवेतील गारव्यामुळे नागरिकांना दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. मंगळवारी ( दि. ९) राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानाचा उतरला असून, अहिल्यानगर येथे ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात तापमानात अजून घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्हयातील तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटू लागल्या असून, दिवसभरच्या गारठ्याने सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. सकाळी फिरायला जातानाही उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठयाची स्थिती कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. किमान तापमानात घट झाल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. मराठवाड्यातही हुडहुडी कायम असून, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर , परभणी, उस्मानाबाद मधील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जळगाव, नाशिक आणि पुण्याचे तापमान ८ ते ९ अंशापर्यंत घसरले आहे. मुंबईतील कमाल तापमान 3४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१. ७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्याच्या अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे. रात्री व पहाटे गार वारा आणि दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील प्रमुख जिल्हयातील किमान तापमान पुढीलप्रमाणे
पुणे 8.9, अहिल्यानगर 7.4, जळगाव 8.4, नाशिक 9.3, उस्मानाबाद 12, छत्रपती संभाजीनगर 11, परभणी 11, अकोला 10.6, अमरावती 10.6, चन्द्रपूर 11.6, गोंदिया 8.6, नागपूर 8.8 , यवतमाळ 9.2