काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:55 AM2018-01-24T11:55:41+5:302018-01-24T11:59:59+5:30

सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले.

changes the face of films time to time : Sharmila Tagore; Symbiosis Cultural Festival in Pune | काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

Next
ठळक मुद्दे‘शर्मिला टागोर संगीत रजनी’तून उलगडला शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ ६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे अलिखित नियमच होते : टागोर

पुणे : बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत चित्रपटांचा चेहराही बदलत आहे. लोकप्रिय चित्रपटांचे योगदान नाकारता येणार नाही. अवास्तव गोष्टी वास्तवाला धरून सांगण्याची ताकद लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटांमध्ये आहे. तज्ज्ञ चित्रपटांबद्दल सखोल लेखन करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना ठराविक प्रतिमेमध्ये अडकवले जायचे. आता कलाकारांची चौफेर मुशाफिरी आणि चित्रपटांचे आशयघन विषयांतून चित्रसृष्टी बहरत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला उजाळा दिला. 
सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी समारंभानंतर ‘शर्मिला टागोर संगीत रजनी’या कार्यक्रमातून शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ संवाद, गाणी आणि चित्रपटातील प्रसंगांतून उलगडला. प्रा. अनुपम सिद्धार्थ यांनी मुलाखतीतून त्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला. मुलाखतीदरम्यान कलाकारांनी टागोर यांची कोरा कागज था ये मन मेरा, ये देख के दिल झुमा, गुनगुना रहे है, दिल ढुँढता है फिर वही, अब के सजन सावन में, चलो सजना जहा तक घटा चले, हम तुम जुदा ना होंगे अशी गाजलेली गाणी सादर करत वातावरणात रंग भरले. त्यांच्या निवडक चित्रपटांतील प्रसंगही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. 
सत्यजित रे यांच्या सिनेमात तेराव्या वर्षी साकारलेली भूमिका, बंगाली ते हिंदी चित्रसृष्टीचा प्रवास, दिग्गज अभिनेत्यांबरोबर दिलेले हिट चित्रपट अशा विविध आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘माझी आई रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर शिकली. त्यांचे फोटो पाहताना खूप मजा येते. टागोर कुटुंबात जन्माला आले हे माझे भाग्य आहे. शांतिनिकेतनमध्ये शिकण्याची माझी इच्छा होती. तेरा वर्षांची असताना सत्यजित रे यांनी मला चित्रपटामध्ये लहान नववधूची भूमिका मला आॅफर केली. त्या काळात चांगल्या घरातील मुलींनी चित्रपटात काम करणे फारसे मान्य नव्हते. मात्र माझी बहीण टिंकूने एका चित्रपटात काम केले होते. त्यामुळे आई-वडिलांनी मलाही परवानगी दिली. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नकार दिला, त्यामुळे मला शाळा बदलावी लागली. बंगाली माध्यमातून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. सुरुवातीला इंग्रजी बोलताना खूप अडचण यायची. मात्र, माझ्या शिक्षिकांनी मला सांभाळून घेतले.’
‘सत्यजित रे यांची कामाची पद्धत खूप छान आणि वेगळी होती. पटकथा वाचा, पण पाठ करू नका, असे ते नेहमी सांगायचे. त्यांनी संवादांमध्ये बोलीभाषा आणली. पूर्वीच्या तुलनेत चित्रपट अधिक सुटसुटीत केले. त्यामुळे वेगळ्या अर्थाने ते चित्रपटांचे जनक आहेत. कामाच्या पद्धतीमुळे सांस्कृतिक, भाषिक मर्यादा ओलांडून त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी आपलेसे केले. चित्रसृष्टीतील परिवर्तनाची सुरुवात रे यांनी केली,’ असेही त्या म्हणाल्या. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीवकुमार अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव, त्यांची स्वभाववैैशिष्ट्ये असे विविध पैैलू त्यांनी गप्पांमधून उलगडले. 
‘६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता,’’असे टागोर म्हणाल्या. 

‘कश्मीर की कली’ या चित्रपटातील ‘ये देख के दिल झुमा’ हे माझे पहिलेच गाणे होते. त्या वेळी मला खूप टेन्शन आले होते. मात्र, गाणे चित्रीत झाल्यानंतर आशा भोसले यांनी माझ्या कामाचे कौैतुक केले आणि मला खूप छान वाटले. 
काम करताना पैैसा महत्त्वाचा असतोच; मात्र त्यापेक्षाही आपले वैैविध्य, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते. सध्या मी अ‍ॅसिड सर्व्हायवर्सच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. अभिनेत्री असल्यामुळे चेहरा किती महत्त्वाचा असतो, हे मला माहीत आहे. त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक जखमा, वास्तवाला सामोरे जाण्याची खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास थक्क करणारा आहे, अशा भावना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या. 

Web Title: changes the face of films time to time : Sharmila Tagore; Symbiosis Cultural Festival in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.