तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपला दणका; पोटनिवडणुकीत संगीता शेळके विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:03 PM2020-01-10T16:03:07+5:302020-01-10T16:06:30+5:30

भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली...

BJP loss in Talegaon Dabhade Municipal Council; Sangita Shelke victory | तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपला दणका; पोटनिवडणुकीत संगीता शेळके विजयी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपला दणका; पोटनिवडणुकीत संगीता शेळके विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपची नगरसेवकांची संख्या दोनने घटून १४ वरून १२ वर

तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील पोट निवडणूकीत अपक्ष उमेदवार संगीता शेळके या ७९५ मताधिक्याने विजयी झाल्या. राज्यातील महाविकास आघाडीचा थेट परिणाम या पोटनिवडणुकीत पहावयास मिळाला.या निकालाने नगरपरिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला दणका बसला असून त्यांना या प्रभागातील आपली जागा गमवावी लागली आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.२ हजार १२९ मतदानापैकी तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना १हजार ४५२मते मिळाली. तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर यांना ६७५ इतकी मते मिळाली.नोटास २० मते पडली.निवडणूक निर्णय अधिकारी संदीप शिर्के यांनी संगीता शेळके यांच्या निवडीची घोषणा केली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंजाड यांनी सहाय्य केले.निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली.भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सुनील शेळके हे या प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते.गुरुवारी याठिकाणी संगीता शेळके आणि कृष्णा म्हाळसकर यांच्यात सरळ लढत झाली.भाजपाने  या प्रभागातील जागा टिकविण्यासाठी  तर विरोधी पक्षाने जागा खेचून आणण्यासाठी कंबर कसली होती. यात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.या पराभवाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.उमेदवार संगीता शेळके यांच्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करीत विजयश्री खेचून आणली.
नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष ,जनसेवा विकास समिती, आरपीआय(आठवले गट)यांची सत्ता आहे. मात्र या निवडणुकीत जनसेवा विकास समितीने भाजपची साथ सोडली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीने एकत्र येत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना पुरस्कृत केले.
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला. दरम्यान,सुनील शेळके आणि संदीप शेळके यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने भाजपची नगरसेवकांची संख्या दोनने घटून १४वरून १२वर आली आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीचे प्रत्येकी सहा नगरसेवक आहेत. यात आता अपक्ष नगरसेवक संगीता शेळके यांची भर पडली आहे.सद्या नगरपरिषदेत भाजपाच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे तर जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे हे उपनगराध्यक्ष आहेत.जनसेवा विकास समितीने अधिकृत पाठिंबा काढल्यास नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्ष अल्प मतात येऊ शकतो. यापुढे ठराव पारित करताना भारतीय जनता पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.संगीता शेळके या माजी नगराध्यक्ष दिवंगत बाळासाहेब शेळके यांच्या सून आहेत.वरिष्ठ  पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे ,पोलीस  उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, संदीप गाडीलकर,कमलाकर भोसलेयांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
 

Web Title: BJP loss in Talegaon Dabhade Municipal Council; Sangita Shelke victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.