Bharati Vidyapeeth gave 25 lakh to flood affected people | भारती विद्यापीठातर्फे पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत
भारती विद्यापीठातर्फे पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत

पुणेःभारती विद्यापीठातर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फौडेंशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप यावेळी उपस्थित होत्या. 

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि  सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा प्रचंड तडाखा बसला. शेकडो गांवे जलमय झाली.  लाखो लोक बेघर झाले.  त्यांचे संसार  उद्ध्वस्त झाले. पिके  आणि जनावरे  वाहून गेल्यामुळे शेतीचे अपरिमित  नुकसान झालेे. अनेकांना प्राणास मुकावे लागले. महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची आणि सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था, बेघर झालेल्यांसाठी निवासाची आणि  भोजनाची सोय, औषधोपचाराची सुविधा तसेच  जनावरांसाठी  छावण्यांची व चार्‍याची व्यवस्था  ठिकठिकाणी भारती विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर गावांची स्वच्छता, रोगराई पसरु नये यासाठीची खबरदारी, आजारी रुग्णांवर औषधोपचार या कामांतही  भारती विद्यापीठाने कृतिशील योगदान दिले. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने  गेली 55 वर्षे  शिक्षणाची गंगा ग्रामीण, दुर्गम भागात नेताना  देशाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक  उन्नतीत मोलाचे योगदान दिले.  डॉ. पतंगराव कदम यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून भारती विद्यापीठाने आपले सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच निभावले आहे. 

Web Title: Bharati Vidyapeeth gave 25 lakh to flood affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.