मंचर शहरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळविले; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 06:05 PM2020-11-26T18:05:51+5:302020-11-26T18:07:09+5:30

मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेले.

Axis Bank ATM machine stolen in Manchar city, Crime registred | मंचर शहरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळविले; गुन्हा दाखल

मंचर शहरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळविले; गुन्हा दाखल

googlenewsNext

मंचर: मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीनच बुधवारी रात्री चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्कार्पियो मधून आलेल्या तीन चोरट्यांनी एटीएम मधील पाच लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. 

याप्रकरणी प्रकाश हिरामण पाटील यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एक लाख रुपयांचे एटीएम मशीन व रोख रक्कम असा सहा लाख एक हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेले. त्यांनी सुरुवातीला स्कॉर्पिओ गाडीला व नंतर एटीएमला दोरी जाऊन बांधली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी आतील कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून ते बंद केला. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीने एटीएम मशीन जोरात ओढले. हे एटीएम मशीन स्कॉर्पिओ गाडी सुमारे साठ फूट अंतरापर्यंत ओढत घेऊन गेली. त्यानंतर तेथे थांबून चोरट्यांनी एटीएम मशीन स्कार्पिओमध्ये टाकले. हा प्रकार परिसरातील काही नागरिक पाहत होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चोरटे एटीएम चोरून नेण्यात यशस्वी झाले. या एटीएममध्ये पाच लाख एक हजार रुपयांची रक्कम होती. 

 घटनेची माहिती समजताच पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्ग तसेच पूर्व भागातील इतर रस्त्यावर नाकाबंदी केली. मात्र हे चोरटे मंचर घोडेगाव रस्त्याने घोडेगाव फाटा येथून जुन्नरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले आहे.अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे वाहन दिसून आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते,पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन पथके तयार करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी रवाना करण्यात आली आहे. 


 

Web Title: Axis Bank ATM machine stolen in Manchar city, Crime registred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.