यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; भावाला चोरीच्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:57 PM2022-01-20T19:57:25+5:302022-01-20T19:57:34+5:30

धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले

ATM burglary gang arrested in Yavat Theft to save his brother from the crime of theft | यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; भावाला चोरीच्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केली चोरी

यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; भावाला चोरीच्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी केली चोरी

Next

पुणे : सोलापूर रोडवरील यवत गावाजवळ असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम कापून त्यामधून २३ लाख ८० हजार ७०० रुपये चोरुन नेणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय २५, रा. करंजी, पो. ता. सिसोड, जि. वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय २२, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांच्याकडून १० लाख रुपये व मोरीची मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त केले.

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यवत येथील महाराष्ट्र बँकेची ए टी एम कापून चोरट्यांनी २३ लाख ८० हजार७०० रुपये चोरुन नेले होते. १७ जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. त्याअगोदर १६ जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पथकाने या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली,तेव्हा दोन - तीन मोटारसायकलवरुन आरोपी जाताना दिसून आले. त्यातील एका मोटारसायकलच्या मागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरुन शोध घेऊन पोलिसांनी या तिघांना पकडले आहे. यवत व कुरकुंभ येथील एटीएम चोरी तसेच लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए टी एम मशीन गॅस कटरने कापून त्यातील ७ लाख ६७ हजार रुपये चोरुन नेले होते. वाशीम येथील घरफोडी करुन १ लाख ८४ हजार रुपयांचे १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरुन नेले होते. हे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

भावाला सोडविण्यासाठी झालेला खर्च वसुल करण्यासाठी केली चोरी

यातील आरोपी ऋषिकेश किरतिके याच्या भावाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला सोडविण्यासाठी वकिल व अन्य बाबींसाठी त्याचा दीड लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे तो या टोळीत सहभागी झाला होता. अजय शेंडे हा सहजपूर येथे राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो १२ वी पास आहे. ऋषिकेश हा कामासाठी त्याच्याकडे येत होता. यातील आरोपी शिवाजी गरड याचीही अजय शेंडे याच्याशी कामासाठी ओळख झाली होती. गरड व शेंडे यांनी पैसे कमविण्यासाठी घरफोडी करण्याचा व ए टी एम चोरी करण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार अजय शेंडे याने यु ट्युबवरुन घरफोडी, ए टी एम चोरी कशी करावी याची माहिती गोळा केली. त्या करीता लागणारे साहित्य ऑनलाईन मागवून घेतले होते. या टोळीवर उघडकीस आलेल्या चार गुन्ह्याव्यतिरिक्त ३ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात १४ एटीएम फोडल्याचे गुन्हे

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात १४ ए टी एम फोडून आतील रोकड लुटून नेल्याचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ टोळ्या पकडल्या आहेत. एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकांना सुरक्षारक्षक नेण्याबाबत बँकांना लेखी पत्र दिले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

या गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक अशोक शेळके व नारायण पवार, सहायक निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, संजय नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली २० पोलीस अंमलदारांची ४ पथके तयार केली होती.

Web Title: ATM burglary gang arrested in Yavat Theft to save his brother from the crime of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.