आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:06 PM2020-06-12T17:06:16+5:302020-06-12T18:10:46+5:30

तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे उद्या प्रस्थान ; पोलीस बंदोबस्त तैनात

Ashadi Wari: Admission will be given to only 50 persons concerned in Alandi | आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

Next
ठळक मुद्देशनिवारी पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक व आरती एकूण सतरा दिवसांसाठी आजोळघरातच माऊली मुक्कामी असणारयाठिकाणी अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम

शेलपिंपळगाव : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी सज्ज झाली आहे. शनिवारी (दि. १३) सायंकाळी चारच्या सुमारास शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून तसेच पन्नास लोकांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर, भक्त निवास व परिसराचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे. प्रस्थान सोहळ्याला परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सुमारे शंभराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
           माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि.१३) पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.


          देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील. त्यानंतर चलपादुकांचे प्रस्थान होईल. वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारातून प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात विराजमान केल्या जातील. समाजआरती झाल्यावर जागर सुरू होईल. एकूण सतरा दिवसांसाठी आजोळघरातच माऊली मुक्कामी असणार आहेत. याठिकाणी अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम पार पाडला जाईल. त्यानंतर राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला (दि. ३० जून) माउलींच्या चल पादुका हेलीकॉप्टर अथवा बसने पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. 
                दरम्यान राज्य शासनाच्या आदेशानुसार मुख्य मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगी शिवाय कोणीही येऊ नये असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे - पाटील यांनी सांगितले. 
..................
 शहराला जोडणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला संबंधित परंपरेने आवश्यक असे मोजकेच मानकरी, सेवेकरी तसेच रथापुढील २७ व रथामागील २० दिंड्यापैकी केवळ पुणे भागातील दिंड्यांच्या मोजक्याच प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. दरम्यान मंदिरात प्रवेश करणाऱ्यापूर्वी संबंधितांना थर्मल स्कॅन व सॅनिटाईज करून मास्क लावल्यानंतर त्यांना मंदिरात घेतले जाईल. वारकऱ्यांना मंदिरात संस्थानतर्फे सॅनिटाईज केलेले टाळ, मृदुंग व पताका दिल्या जातील. दरम्यान शहराला जोडणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
............................
 प्रस्थानच्या दिवशी मंदिरालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश 
 माऊली मंदिर परिसर कंटेन्मेंट झोनलगत असल्याने प्रस्थानपूर्वी माऊलींचे संपूर्ण मंदिर, भक्त निवास तसेच परिसर स्वच्छ करून निजंर्तुक केला आहे. तर नगरपालिकेने परिसरात औषध फवारणी केली आहे. विशेष खबरदारी म्हणून प्रस्थानच्या दिवशी मंदिरालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश नगरपालिका प्रशासनाने जारी करण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. 

Web Title: Ashadi Wari: Admission will be given to only 50 persons concerned in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.