असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:34 PM2018-10-30T18:34:43+5:302018-10-30T18:36:36+5:30

शब्द आणि संगीत यांचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या अवीट गाण्यांनी देव यांची देववाणी आणि देवगाणीची मैफल चिंचवडला रंगली होती...

Asen me nasen mi ... But tomorrow florescence will be in a song ! | असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...! 

असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...! 

Next
ठळक मुद्देसंगीत क्षेत्रातील देव माणसांचा गौरव हा अपूर्व सोहळा शहरवासियांनी अनुभवला. 

विश्वास मोरे 
पिंपरी : रामकृष्ण मोरे सभागृह.. साल २००१..आणि व्यासपीठावर आशा भोसले यांची उपस्थिती.. हे सर्व वर्णन आपल्याला त्या सोहळ्याचे महत्व अधोरेखित करुन जाते.. तो अमृताचा सोहळा होता भारतीय चित्रपट संगीतातील  ऋषितुल्य शिरोमणी प्रसिद्ध संगीतकार, शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार पं. यशवंत देव यांना समर्पित. मंगळवारी त्यांचे निधन झाले..त्यांच्याविषयीची आठवणींना उजाळा देताना पिंपरी चिंचवडकरांचे डोळे पाणवतात..तो अभूतपूर्व क्षण जसाच्या तसा त्यांच्यासमोर उभा राहतो...पण काळ पटलांवरही देव यांच्या असेन मी नसेन मी ..तरी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..या गाण्याच्या ओळीच सर्वश्रेष्ठ ठरतात..
शब्द आणि संगीत यांचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या अवीट गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर घातलेली मोहिनी सर्वश्रुत आहे. देव यांची देववाणी आणि देवगाणीची मैफल चिंचवडला रंगली होती...औचित्य होतं..नादब्रम्ह परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कवी, गीतकार, संगीतकार पं.यशवंत देव यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याचे.....चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५ नोव्हेंबरचा २००१ हा सुवर्णक्षरात लिहिला गेला असणार यात शंका नाही.औद्योगिकनगरीपासून सांस्कृतिक नगरी असा लौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरवासियांना देवगाणी आणि देववाणीचा याचि देही याचि डोळा असा साक्षात्कार झाला. या सोहळ्यासाठी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे, प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या.
शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार देव यांनी अनेक गीतांना संगीतसाज चढवून भावसंगीताचे विश्व समृद्ध केल. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात देवगाणी सादर झाली. त्यामध्ये देव यांच्यासमवेत चिंचवडची गायिका सावनी रवींद्र यांचाही सहभाग होता. यावेळी संयोजक डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. 
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...असेन मी नसेन मी...,अखेरचे येतील माझ्या..दिवस तुझे हे फुलायचे..स्वर आले दुरुनी..  तिन्ही लोक आनंदाने...जीवनात ही घडी...अशी अवीट गोडींची गाणी सादर केली होती. तसेच गाण्यांच्या आठवणीही देव यांनी सांगितल्या होत्या. देवगाणी संपल्यानंतर गौरव सोहळा झाला. यावेळी पंच्याहत्तर हजार रोख, मानपत्र देऊन देव यांचा गौरव आशातार्इंनी केला होता. याच कार्यक्रमातून देशपातळीवर प्रसिद्ध झालेला नाट्य परिषदेचा प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले पुरस्कार जन्माला आला..विशेष म्हणजे पुरस्काराच्या रकमेत प्रा. मोरे यांनी पंचवीस हजारांची भर टाकून शब्दप्रधान गायिकांचा गौरव केला होता. 
या कार्यक्रमात देव यांच्याविषयी बोलताना आशा भोसले म्हणाल्या होत्या, यशवंत देव हे प्रसिध्द संगीतकार आहे. मात्र, माझ्या दुर्देवाने त्यांच्यासोबत मला जास्त गाणी गाता आले नाही. तसचे एकदा तर त्यांच्याशी मी गाणे गाण्याची संधी मिळावी या हेतूने मी भांडले होते. त्यातूनच मला देव यांच्याकडून विसरशील खास मला दृष्टीआड होता हे गाणे गायला मिळाले.. 
 डॉ. रवींद्र घांगुर्डे देव यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे ही भारतीय संगीतातील घराणी आणि विद्यापीठे आहेत. त्यातील देव आणि नादब्रम्ह परिवाराचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यातूनच पंच्याहत्तरीचा सोहळा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले होते. त्यांचा यथोचित गौरव आशातार्इंच्या हस्ते करण्यात आला. संगीत क्षेत्रातील देव माणसांचा गौरव हा अपूर्व सोहळा शहरवासियांनी अनुभवला. 

Web Title: Asen me nasen mi ... But tomorrow florescence will be in a song !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.