जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..! पुण्यात शासकीय इतमामात डॉ. बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:47 IST2025-12-09T18:45:58+5:302025-12-09T18:47:26+5:30
येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉ बाबा आढाव श्रद्धांजली सभा होणार आहे

जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..! पुण्यात शासकीय इतमामात डॉ. बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार
पुणे: ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रुजविण्यासाठी अहोरात्र झटणारे, असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्य समर्पित करणारे, समाजात समता व बंधुतेचा जागर करणारे, घराेघरी संविधान पाेहाेचवण्याचा संकल्प करणारे कष्टकऱ्यांचे नेते, सर्वांचे लाडके 'बाबा' अर्थात डाॅ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. आज दिवसभर त्यांचे पार्थिव पुण्यातील हमाल भवन येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा...! अमर रहे अमर रहे बाबा तेरा नाम अमर रहे च्या घोषणा देत नागरिकांनी बाबांना अखेरचा निरोप दिला. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभा होणार आहे.
नेहमीच कष्टकऱ्यांच्या आवाजांनी गजबजणारे मार्केट यार्ड येथील हमाल भवन मंगळवारी (दि. ९) दु:खात अखंड बुडाले हाेते... राजकीय नेता असाे किंवा अधिकारी... कामगार असाे की व्यापारी... महिला असाे की चिमुकली... जाे ताे रांगेतून पुढे पुढे येत कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत हाेता. चेहरा पाेहताच अश्रुंना बांध फुटत हाेता. कष्टकऱ्यांबराेबरच विविध क्षेत्रात कार्य करणारे दिग्गज देखील अश्रुंना आवर घालू शकले नाहीत. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचलेले, नेतिक अधिष्ठान असलेले असे नेतृत्व हाेणे नाही. सर्वांचा आधारवड हरपला, अशी भावना व्यक्त करत हाेते.
हमाल भवन येथे सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव आणले गेले. त्यापूर्वीच कष्टकऱ्यांनी गर्दी केली हाेती. सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचपर्यंत अंत्यदर्शनाची रांग अखंड सुरू हाेती. कष्टकऱ्यांसह राजकारणातील, समाजकारणातील, व्यापारी यांसह विविध क्षेत्रातील मंडळी अंत्यदर्शन घेत हाेते. आढाव कुटुंबियांचे सांत्वन करीत हाेते. सायंकाळी चार वाजता मानवंदना देण्यासाठी पाेलिसांचा ताफा हमाल भवनात पाेहाेचला. सलामी दिली. त्यानंतर बराेबर पाच वाजता पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनात ठेवून अंत्ययात्रा वैकुंठकडे मार्गस्थ झाली. शासकीय इतमामात संत्यसंस्कार झाले. हा संपूर्ण दिवस ‘अमर रहे अमर रहे, बाबा आढाव अमर रहे’, ‘सत्य की जय हाे’च्या घाेषणांनी दणाणून गेला हाेता.
मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांची किडनीही निकामी झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबांच्या निधनाने कष्टकरी, असंघटित कामगारांमध्ये शोककळा पसरली आहे. बाबांच्या निधनाचे वृत्त कळताच कष्टकरी व श्रमिकांची पावले रुग्णालयाकडे वळली. डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ होते. 'हमाल पंचायती'ची स्थापना हे त्यांच्या सामाजिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण योगदान. हमाल पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. यासोबतच जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आढाव हे सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुले असीम आणि अंबर, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
पुण्यातील एका सामान्य कुटुंबात १ जून १९३० रोजी बाबांचा जन्म झाला. तीन महिन्यांचे असतानाच त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर ते आजाेळीच माेठे झाले. स्वातंत्र्यापूर्वी वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्र सेवा दलात दाखल झाल्यावर त्यांना भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आणि बापू काळदाते यांचा सहवास लाभला. साने गुरुजी आणि एस. एम. जोशी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याने, ते भारत छोडो चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभागी होते. दलितांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९४८ मध्ये झालेल्या आंदोलनात साने गुरुजी यांना बाबांनी मदत केली. त्यानंतर बाबांनी उच्च शिक्षणासाठी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक आणि राजकीय कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या लेखन व कार्याने प्रेरित होऊन ते महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित कामगार चळवळीत सहभागी झाले. वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर नाना पेठेत स्वतःचे वैद्यकीय क्लिनिक सुरू केले. ही प्रॅक्टिस त्यांनी १४ वर्षे चालवली आणि नंतर त्यांचा सर्व वेळ आणि संसाधने सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. दरम्यान, त्यांचा विवाह शीला गरुड यांच्याशी झाला, दोन मुले झाली. तरीही सामाजिक कार्यात ते सक्रियच राहिले. याच काळात बाबांनी अन्नधान्याच्या चढ्या किमतींविरोधात सत्याग्रह केला. यासाठी त्यांना तीन आठवडे तुरुंगवासही भोगावा लागला.
डाॅ. आढाव यांनी नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वयंरोजगार महिला संघटनेसाठी अरुणा रॉय आणि नर्मदा बचाओ आंदोलन आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी, पुनर्वसन परिषद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत काम केले. आजवरच्या वाटचालीत त्यांना ५३ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. याचदरम्यान १९६२ मध्ये त्यांनी सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे हाेणाऱ्या लोकांच्या विस्थापनाविरुद्ध लढा दिला. या आंदोलनात त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यात त्यांना एका डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली. कष्टाची भाकर (कष्टाचे अन्न) या उपक्रमालाही पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह (१९५६ ते १९६०) गोवा स्वातंत्र्य संग्रामातही (१९४०-१९६१) बाबा सामील झाले हाेते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने ‘एक गाव, एक पाणवठा’ उपक्रम हाती घेतला हाेता.