Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:53 IST2025-06-21T18:52:29+5:302025-06-21T18:53:46+5:30

आई तसलीम शेख यांनी इरफानचे पार्थिव असलेल्या पेटीवर हात फिरवत ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर... उठ ना बेटा...’ असा हंबरडा फोडला. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

Ahmedabad Air India Plane Crash Mother of Air India crew member Irfan Sameer Sheikh, who died in a plane crash, breaks silence | Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

नेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) :अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर दहा दिवसांनी डीएनए चाचणी यशस्वी झाल्यानंतर एअर इंडियातील क्रू मेंबर इरफान समीर शेख या बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर...’ असा हंबरडा आईने फोडताच सारा परिसर शोकाविव्हल झाला. इरफानवर पिंपरीतील नेहरूनगरमधील हजरत बिलाल कब्रस्तानमध्ये सकाळी नऊ वाजता दफनविधी करण्यात आले.

इरफानने लहानपणापासूनच आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले होते. ते त्याने कष्टाने पूर्णही केले; परंतु त्याच आकाशात उंच भरारी घेत असतानाच त्याच्या आयुष्याचा १२ जून रोजी अहमदाबाद विमान दुर्घटनेत अंत झाला. सर्वच दुर्घटनाग्रस्तांचे शरीर छिन्नविच्छिन्न होऊन जळाल्यामुळे इरफानच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या वडिलांचे डीएनए नमुने घेण्यात आले होते. डीएनए चाचणीचा अहवाल येण्यात आठ ते नऊ दिवसांचा कालावधी गेला.

मृतदेहाची ओळख पटल्याने दुर्घटनेच्या दहा दिवसांनंतर तो अहमदाबादवरून पुणे विमानतळावर आणि तेथून रुग्णवाहिकेद्वारे पिंपरीतील संत तुकारामनगरमधील निवासस्थानी सकाळी आठ वाजता आणण्यात आला. त्यावेळी आई-वडील, भाऊ व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या मित्र, नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू तराळले होते.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे व उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा धर-शिलवंत, सदाशिव खाडे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, मायला खत्री, अजिज शेख, फारुक इनामदार, राजरत्न शिलवंत, अमित भोसले आणि एअर इंडियातील कर्मचारी उपस्थित होते.

जेथे ईदची नमाज अदा केली, तेथेच जनाजाची नमाज !

आई तसलीम शेख यांनी इरफानचे पार्थिव असलेल्या पेटीवर हात फिरवत ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर... उठ ना बेटा...’ असा हंबरडा फोडला. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दोन आठवड्यांपूर्वी बकरी ईदनिमित्त जेथे इरफानने नमाज अदा केली होती, तेथेच त्याच्या जनाजाची नमाज अदा करण्यात आली. यावेळी सगळ्यांचे काळीज गलबलून गेले.

Web Title: Ahmedabad Air India Plane Crash Mother of Air India crew member Irfan Sameer Sheikh, who died in a plane crash, breaks silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.