खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:02 AM2021-01-28T11:02:12+5:302021-01-28T11:03:38+5:30

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही केली होती फसवणूक

Accused was arrested who cheating of use name of MP Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक

खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक

Next

पुणे : लॉकडाऊनच्या काळात एका बांधकाम व्यावसायिकाला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन फसविण्याचा प्रयत्न करणार्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुरेश बंडु कांबळे (रा. गंज पेठ) याचा पोलीस शोध घेत आहेत. विशाल शेंडगे याने यापूर्वी आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन करुन अनेकांची फसवणूक केली होती. त्यांच्याविरोधात यापूर्वी ७ गुन्हे दाखल आहेत. त्यात तो जामीनावर सुटला होता.

याबाबत गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांना विशाल शेंडगे याने फोन केला. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. फोन केलेल्या व्यक्तीबाबत शंका आल्याने गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणेपोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.

तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी विनोद साळुंखे, अमोल पिलाने, शिरोळकर, गुरव यांच्या पथकाने शेंडगे याला पकडले. शेंडगे याला त्याचा साथीदार कांबळे हा फोन करण्यासाठी सीमकार्ड पुरवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. शेंडगे हा चोरीचा फोन व सीमकार्डचा वापर करून त्याच्यावरून नागरिकांना आमदार खासदार यांच्या नावाने फोन करत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Accused was arrested who cheating of use name of MP Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.