बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी परिसरात लावली पाच फुटांची डबल जाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 04:12 PM2022-05-15T16:12:07+5:302022-05-15T16:12:20+5:30

खेड तालुक्याततील रेटवडी, जऊळके भागात एका बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता

A five foot double net was set up in the area to secure the leopard safely in khed | बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी परिसरात लावली पाच फुटांची डबल जाळी

बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी परिसरात लावली पाच फुटांची डबल जाळी

Next

श्रीकिशन काळे 

पुणे : खेड तालुक्याततील रेटवडी, जऊळके भागात एका बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता. त्यामुळे त्याचा शोध वन विभाग घेत होता. त्यासाठी अगोदर बिबट्याचा शोध ड्रोनद्वारे घेण्यात आला. त्याचा सुगावा लागल्यानंतर संबंधित जागेच्या भोवती जाळी लावून तो परिसर बंद केला. या जाळीच्या आत पिंजरे लावले होते, त्यामध्ये तो बिबट्या अलगदपणे जेरबंद झाला. एखाद्या बिबट्याला सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे कसे पकडावे, याचा हा उत्तम नमुनाच पहायला मिळाला आहे.  

ही कामगिरी उपवनसंरक्षक अधिकारी, जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड, चाकण, घोडेगाव येथील वन कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पार पाडली. तसेच माणिकडोह येथील एसओएस संस्थेची टीम देखील मदतीला होती. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने तिघांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भिती पसरली होती. त्यामुळे वन विभागाने १२ मे रोजी बिबट्याचा शोध सुरू केला. त्यासाठी ड्रोनचाही वापर केला. तेव्हा जऊळके गावाच्या एका शेतात तो हत्ती गवतात असल्याचे दिसले. त्यानंतर त्याला कसे पकडायचे ? याचा प्लान तयार करण्यात आला. कारण आजुबाजूला खूप ग्रामस्थ जमा झालेले होते. त्यांची सुरक्षा व वन कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहणे गरजेचे होते. हत्ती गवतात तो लपल्यामुळे त्याला शोधणं अवघड जात होते. पण त्याचे नेमके ठिकाण ड्रोनमुळे समजले होते. त्यानंतर तो संपूर्ण परिसरात पाच फुटांची जाळी लावली. ही जाळी डबल करून  लावली आणि जाळी खालून तो पळून जाऊ नये म्हणून तिथे बांबूने बांधले. तसेच आतमध्ये तीन पिंजरे ठेवले. ते पिंजरे जाळीच्या बाजुलाच होते. त्या पिंजऱ्यावर येऊन तिथून जाळीवर उडी मारू नये, याची देखील काळजी घेतली गेली. त्यासाठी पिंजऱ्यावर बाभळीच्या काटेरी फांद्या टाकल्या होत्या. जेणेकरून पिंजऱ्यावर तो जाऊ नये.

भूक लागली अन् तो आला...

बिबट्याने तिसरा हल्ला एका महिलेवर केला होता. त्यानंतर एका शेळीलाही मारले होते. ती शेळी त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आली. कारण त्याला भूक लागली की, तो त्या शेळीच्या वासाने पिंजऱ्यात अलगद सापडू शकतो. त्या प्रमाणे तो त्या पिंजऱ्यामध्ये गेला आणि सर्वांनी निश्वास सोडला असल्याचे प्रदीप रौधळ (वनपरीक्षेत्र अधिकारी, खेड) म्हणाले आहेत.  

बिबट्या ज्या ठिकाणी होता, त्याला बेशुध्द करणं अवघड होतं. डार्ट मारला तरी लगेच त्याचा परिणाम होत नाही. काही मिनिटे जावे लागतात. म्हणून सुरक्षितपणे जाळी लावून बिबट्याला पकडण्याला पर्याय दिला.  त्यानूसार त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले असे डॉ. निखिल बनगर (वन्यजीव पशूवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह) यांनी सांगितले. 

जऊळके गावात एकावर हल्ला केल्यानंतर बिबट्या पसार झाला होता. त्याचा शोध वन विभाग घेत होता. त्यासाठी त्याचे पायाचे ठसे पाहिले गेले आणि ड्रोनचा वापर केला गेला.  बिबट्या ज्या ठिकाणी लपला होता, तिथे हत्ती गवत होते. आजुबाजूला वन कर्मचारी, लोकं होती. त्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी जाळीचा पर्याय निवडला.  - संदेश पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी

Web Title: A five foot double net was set up in the area to secure the leopard safely in khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.