८५ वर्षांच्या काका लिमये यांनी उलगडला ‘सवाई’च्या आठवणींचा पट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:11+5:30

माझे सवाईशी 1954 सालापासून ॠणानुबंध जुळलेले..

85-year-old KaKa Limaye revealed the memories of Sawai's | ८५ वर्षांच्या काका लिमये यांनी उलगडला ‘सवाई’च्या आठवणींचा पट

८५ वर्षांच्या काका लिमये यांनी उलगडला ‘सवाई’च्या आठवणींचा पट

Next
ठळक मुद्दे सवाई गंधर्व महोत्सवानेच मूळ शास्त्रीय संगीताचा गाभा जपलानव्या पिढीसाठी पुस्तक ‘लिहीन’ अ

नम्रता फडणीस
पुणे :  माझे सवाईशी 1954 सालापासून ॠणानुबंध जुळले आहेत. त्यावेळी रेणुका स्वरूपमध्ये सवाई गंधर्व महोत्सव होत असे. गोखले मांडववाले यांचा मंडप होता.  डॉ. प्रभा अत्रे यांची स्वरमैफील सुरू असताना अचानक जोरात पाऊस सुरू झाला. मांडव संपूर्ण भिजला. आता सर्व रसिक कुठे बसणार? अशा चिंतेत पं. भीमसेन जोशी असताना गोखले यांनी तात्काळ दहा हजार पाट आणले आणि पाटावर बसून रसिकांनी गाण्याचा आनंद लुटला...अशा ‘सवाई गंधर्व महोत्सवासह पं. भीमसेन जोशी यांच्याविषयीच्या विविध आठवणींचा पट  ‘सवाईचा चालता बोलता इतिहास’असलेल्या काका लिमये यांनी उलगडला.   
गेल्या 65 वर्षांपासून ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये सहभागी होणाऱ्या 85 वर्षांच्या काका लिमये यांनी ’लोकमत’शी बोलताना सवाईच्या’सुरेल’ स्मृतींचा काळ उलगडला. पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे ते वडील.  गतवर्षी तब्येत बरी नसल्यामुळे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला ते उपस्थित राहू शकले नव्हते. पण यंदाच्या वर्षी महोत्सवाला हजेरी लावत व्हिलचेअरवर बसूनच सर्व कलाकारांच्या अविष्कारांचा ते श्रवणीय आनंद घेत आहेत.,
पूर्वीच्या काळी महोत्सवात रंगलेल्या मैफलींविषयी ते भरभरून बोलत होते. या वयातही सर्व गोष्टी त्यांना लख्ख प्रकाशासारख्या आठवत होत्या.  त्याचेच अधिक अप्रृप वाटले. ते म्हणाले, पूर्वी सवाई गंधर्व महोत्सव हा रात्रभर चालायचा. रात्री 7 वाजता सुरू झालेली मैफील दुस-या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत चालायची. त्यावेळी कुणी घड्याळ लावून कलेचे सादरीकरण करीत नव्हते. मात्र आता मैफीलींना 10 पर्यंत सादरीकरणाची मर्यादा  घालण्यात आली आहे. त्यामुळे कलाकारांना म्हणावे तसे आपले सादरीकरण करता येत नाही.  पं. शिवकुमार शर्मा स्वरमंचावर बसल्यानंतर किमान त्यांना दोन तास तरी हवेत का नको? पण वेळेच्या मर्यादेमुळे कुणी काहीच करू शकत नाही. 
पं. भीमसेन जोशी यांच्याशी माझे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. ते मला  ‘काका’म्हणायचे. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी मनात कोरल्या गेलेल्या आहेत. एका मैफीलीमध्ये उस्ताद झाकीर हुसेन, पं. भीमसेन जोशी आणि एकीकडे पु.ल देशपांडे बसले होते. पंडितजी म्हणाले, आज मी  ‘तीर्थ विठ्ठल’ गातो. जवळजवळ वीस मिनिटे ते   ‘विठठल विठठल’ गात होते. उस्ताद झाकीर हुसेन आणि पुलं वादन करत होते. मी त्यांना विचारले की इतक्या वेळा ‘विठठल विठठल’ का म्हणत आहात? त्यावर ’विठठल’’ म्हटल्यानंतर हदयातले क्लॉटस निघून जातात असे ते  मिश्कीलपणे म्हणाले. पं.भीमसेन जोशी, पं. वसतंराव देशपांडे, पु.ल देशपांडे ही व्यक्तिमत्व ग्रेटच होती. माझ्या आठवणीप्रमाणे पं. भीमसेन जोशी मिळेल ती बिदागी घेऊन गात होते. मात्र आज आयुष्य खूप गतिमान झाले आहे. सगळयालाच  ‘कमर्शियल टच’ आलेला आहे. जगभरात विविध ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम होतात. पण सवाई गंधर्व महोत्सवानेच मूळ शास्त्रीय संगीताचा गाभा जपला आहे. 
एकदा पंढरपूरला मैफील होती. पं. भीमसेन जोशी यांच्याबरोबर पं. रविशंकर आणि उस्ताद झाकीर हुसेन मैफीलीला बसले होते. भीमसेन जोशी यांची आलापी पूर्ण होईपर्यंत झाकीर हुसेन शांतच बसणार ना? मग त्यांनी वाजवायला सुरूवात केली. तेव्हा आयोजकांनी झाकीर हुसेन यांना  ‘तुम आधा घंटा तो चूप बैठे थे, तो तुमको बिदागी क्यूं दे’ असे म्हटल्याची आठवण काका लिमये यांनी सांगितली. सवाईच्या स्वरमंचाने आम्हाला पुढे आणले अशी सर्व कलाकारांची भावना असल्याचेही ते म्हणाले. 
 ‘या आठवणींवर एखादे पुस्तक लिहिले आहेत का? असे विचारले असता त्यांनी  ‘नाही’ असे प्रांजळपणे सांगितले. पण नव्या पिढीसाठी पुस्तक ‘लिहीन’ असेही ते म्हणाले. 

.....

गोकुळ अष्टमीला पं. हरिप्रसाद चौरसिया करतात रात्रभर  ‘ वादन’
     आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया गोकुळअष्टमीला अंधेरी येथील त्यांच्या गुरूकुलमध्ये रात्रभर बासरी वादन क रतात. हे कुणाला माहिती नाही. शिव-हरीजी एकमेकांना भाऊ मानतात. पं. हरिप्रसाद सोवळ नेसतात आणि पं शिवकुमार शर्मा पूजा करतात. बारानंतर काही रसिक निघून जातात. मग पं. हरिप्रसाद म्हणतात,  ‘अब सुननेवाले बैठेंगे’. देखो अब मैं क्या बजातू हूं. असे म्हणून ते सकाळपर्यंत वादन करतात, अशी आठवण देखील काका लिमये यांनी सांगितली.

Web Title: 85-year-old KaKa Limaye revealed the memories of Sawai's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.