3 caror rupees stolen by hacking mahasecure app | महासिक्युअर अ‍ॅप हॅक करुन सराफी पेढीला ३ कोटींचा गंडा ; पुण्यातील घटना
महासिक्युअर अ‍ॅप हॅक करुन सराफी पेढीला ३ कोटींचा गंडा ; पुण्यातील घटना

पुणे : महाराष्ट्र बँकेने पुण्यातील सराफी पेढीला दिलेल्या महासिक्युअर अ‍ॅप सायबर चोरट्यांनी हॅक करुन त्यात लॉगइन करुन पासवर्ड बदलून त्यांच्या १२ बँक खात्यातून तब्बल २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचा दरोडा टाकून लंपास केला. ही घटना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली आहे. दरम्यान, याची तक्रार सायबर पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी तपास करुन ही रक्कम देशातील २० बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी १८ लाख रुपये या खात्यात शिल्लक आढळल्याने ती रक्कम गोठविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिंहगड रोडवर असलेल्या या सराफी पेढीच्या एकूण २९ शाखांपैकी काही बँक खाती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत. या बँक खात्यावरुन ऑनलाईन ट्रान्झेक्शन करण्यासाठी महासिक्युअर अ‍ॅपची सुविधा बँकेकडून घेतली आहे. त्याकामी बँक अकाऊंटला लिंक असणारा मोबाईल नंबर आहे. तो सराफी पेढीच्या मालकाच्या ताब्यात असतो. स्थानिक शाखांमधून जमा होणारी रक्कम महासेक्युअर अ‍ॅपद्वारे बँक ऑफ महाराष्ट्राच्या सिंहगड रोड शाखेत ट्रान्सफर केली जाते. सराफी पेढीतील सहा कॉम्प्युटरवर महासिक्युअर अ‍ॅप इन्स्टाॅल केलेले आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या महासिक्युअर अ‍ॅपमध्ये लॉगइन होत नव्हते. त्यानंतर त्यांनी महासिक्युअर अ‍ॅपच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करुन लॉगइन होत नसल्याचे सांगितले व आमचा सेक्युरिटी प्रश्न बदललेला असल्याचे सांगितले. 

त्यावर हेल्पलाईनवरुन पुन्हा दोन तासांनी लॉगइन करायला सांगितले. तरीही लॉगइन झाले नाही. १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबरलाही लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात एररमध्ये कोणीतरी इतर युझरने लॉगइन केले असे आले. त्यानंतर त्यांनी अ‍ॅपचा पासवर्ड अ‍ॅक्टिव्हेशन की द्वारे रिसेट केला व लॉगइन करुन बँक खात्याची पडताळणी केली असता त्यांच्या खात्यातून २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्याकडे धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तपास केल्यावर १२ खात्यातून इतर २० बँक खात्यात ही रक्कम ११ व १३ नोव्हेंबरला ट्रॉन्सफर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या २० खात्यांपैकी १९ बँक खाती निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. या खात्यांमध्ये शिल्लक असलेली १८ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यास संबंधित बँकेला सांगण्यात आले आहे. ही सर्व भारतातील बँक खाती आहेत. सायबर पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत आहेत.

असे केले महासिक्युअर अ‍ॅप हॅक
महा बँकेने या सराफी पेढीला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी महासिक्युअर अ‍ॅप दिले आहे. यात लॉगइन केल्यावर ऑप्शन निवडल्यानंतर पाठवायची रक्कम नमुद केल्यावर व इतर माहिती भरल्यावर ट्रान्सक्शन पासवर्ड विचारला जातो. जो बँकेकडून पुरविलेला असतो. त्याची माहिती दिल्यावर ठराविक ट्रान्सक्शनसाठी ओटीपी महासेक्युअर अ‍ॅपमध्ये जनरेट होतो. जनरेट झालेला ओटीपी सबमिट केल्यानंतर ट्रान्झेक्शनचे पैसे ट्रान्सफर होतात. सायबर चोरट्यांनी महासिक्युअर अ‍ॅप सर्व प्रथम हॅक केले. त्यानंतर त्यात त्यांनी लॉगइन केले. त्यानंतर त्यात २० बँक खाती समाविष्ट केली. त्याचा पासवर्ड बदलला. त्यानंतर ११ नोव्हेंबरला हॅकरने सर्व प्रथम २४ व्यवहाराद्वारे या २० बँक खात्यात दीड लाखांपासून १५ लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर हॅकरने १३ नोव्हेंबरला अशाच प्रकारे आणखी २२ व्यवहाराद्वारे आणखी पैसे या २० खात्यात ट्रान्सफर केले. अशा प्रकारे दोन दिवसात ४६ व्यवहारामार्फत २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये ट्रान्सफर करुन गंडा घालण्यात आला.

Web Title: 3 caror rupees stolen by hacking mahasecure app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.