Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:22 PM2021-10-24T16:22:14+5:302021-10-24T16:23:46+5:30

देशात शंभर कोटी लोकांचे लसीकरण (corona vaccination) झाले असतानाच पुणे जिल्ह्याने देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे

100 crore in the country and 1 crore in Pune | Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’

Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ९२ टक्के लोकांचा पहिला, तर ५४ टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : देशात शंभर कोटी लोकांचे लसीकरण (vaccination) झाले असतानाच पुणे जिल्ह्याने देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ५८ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. हा पहिला डोस ९२ टक्के लोकांना, तर दुसरा डोस ५४ टक्के लोकांना देण्यात आला आहे.

राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सुरुवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. परंतु जुलै- ऑगस्टपासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध केली. यामुळेच जिल्ह्यात ऑगस्टनंतरच लसीकरणाला वेग आला. शासनासोबतच खासगी रुग्णालये आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला, तर जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी करून दिवसाला तब्बल एक-दीड लाख लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असे नियोजन केले. तर गेल्या पंधरा दिवसांपासून "मिशन कवचकुंडल " अभियानांतर्गत, तर दिवस रात्र व सुट्टीच्या दिवशी विकेंड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात अनेक आमदार- खासदार व लोकप्रतिनिधींनीदेखील पुढाकार घेतला. सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून पुणे जिल्ह्याने एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला.

लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची आली होती वेळ

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात लसीकरणाने चांगला वेग पकडला होता, पण केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना सरसकट लसीकरण सुरू केल्याने मोठ्याप्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे दीड -दोन महिने शहर आणि जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती; परंतु आता सर्व केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू आहे.

पुणे शहरामध्ये शंभर टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण

जिल्ह्यात पुणे शहरातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शहरामध्ये ३० लाख ९२७ लोकांना पहिला डोस देणे अपेक्षित असताना आतापर्यंत शहरामध्ये ३१ लाख ५७ हजार ७२८ (१०५ टक्के) लोकांना पहिला डोस दिला आहे, तर दुसरा डोस १७ लाख ७९ हजार ३४६ ( ५६ टक्के) लोकांना दिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

कार्यक्षेत्र                           पहिला डोस                दुसरा डोस                         एकूण

पुणे मनपा                        ३१५७७२८ (१०५%)     १७७९३४६ ( ५६%)               ४९३७०७४
पिंपरी-चिंचवड                    १४०३४२९(80%)        ७८४१७४ (५६%)                २१८७६०३
ग्रामीण                              ३०८२२६३(८३%)        १५५१५४६ (५०%)              ४६३३८०९
एकूण                                ७४४३४२० (९२%)        ४११५०६६ (५४%)            ११७५८४८६

Web Title: 100 crore in the country and 1 crore in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.