"...मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा"; शिवसेनेचा भाजपा नेत्यांना टोला

By प्रविण मरगळे | Published: November 21, 2020 08:20 AM2020-11-21T08:20:32+5:302020-11-21T08:23:20+5:30

Shiv Sena, BJP, China Pakistan Border Clashes News: श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे.

"What else to do when you forget the critical situation facing the country?"; Shiv Sena Target BJP | "...मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा"; शिवसेनेचा भाजपा नेत्यांना टोला

"...मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा"; शिवसेनेचा भाजपा नेत्यांना टोला

Next
ठळक मुद्देलडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे.ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा.देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे?

मुंबई - चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. काश्मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर, पाकव्याप्त कश्मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार? चीनचे काय करणार? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.

तर गेल्या चार दिवसांत हिंदुस्थानी सैन्याने पाकच्या हद्दीत गोळाबारूद फेकून त्यांच्या चौक्या वगैरे मारल्या, बंकर्स पेटवले हे खरे, पण आमच्या हद्दीत आमचेच जवान मारले गेले. त्यातील दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेटय़ा महाराष्ट्रात आल्या. या शवपेटय़ा जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? असा टोलाही राज्यातील भाजपा नेत्यांना लगावण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय? चिनी सैन्याने हिंदुस्थानच्या हद्दीत लडाखमध्ये घुसखोरी केली. चिनी सैन्य जे आत घुसले ते मागे जायला तयार नाही.

मागे हटण्यासंदर्भात दोन देशांतील सैन्य अधिकाऱ्यांत चर्चा, वाटाघाटी सुरू आहेत. चिनी आमच्या जमिनीवर घुसले आहेत, पण चर्चा, वाटाघाटीचा मार्ग आपण स्वीकारला हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. जमीन आमची व ताबा चिनी सैन्याचा, पण चीनचे नाव घेऊन आमच्या पंतप्रधानांनी, संरक्षणमंत्र्यांनी, भाजप पुढाऱयांनी दम भरल्याचे चित्र दिसत नाही.

हे सर्व दमबाजी प्रकरण पाकिस्तानसाठी राखीव असावे. चीनचा विषय निघालाय म्हणून सांगायचे, हिंदुस्थानचा मित्रदेश भूतानच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसले असून डोकलामजवळचे एक गाव ताब्यात घेतले. हे गाव भूतान-हिंदुस्थानच्या सीमेवर आहे. तेथे चीनने घुसणे हे आमच्यासाठी खतरनाक आहे. त्याआधी डोकलाम सीमेवर चिनी सैन्य घुसलेच होते व तेथे हिंदुस्थानी सैन्याबरोबर वारंवार झटापट झाली आहे. आता डोकलाम पार करून चिनी सैनिक आत गावात जाऊन बसले आहेत.

भूतानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी हिंदुस्थानी सैन्याची आहे. कारण भूतान अस्थिर होणे म्हणजे हिंदुस्थानच्या सीमांना भगदाड पाडण्यासारखे आहे. पाकिस्तानने नव्हे तर चिनी सैन्याने आमच्या सीमा साफ कुरतडल्या असून दिल्लीश्वर डोळे झाकून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या झांज-चिपळय़ा वाजवीत आहेत कश्मीर खोऱ्यातून तिरंग्यात लपेटलेल्या जवानांच्या शवपेटय़ा येत आहेत,

श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे. लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे. ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा.

चिनी सैन्य फक्त डोकलामच्या गावात घुसून थांबले नाही, चिन्यांनी हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याच्या मोहिमा राबविल्याचे दिसत आहे. सिक्कीमच्या सीमेवरही चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. हिंदुस्थानचे सैन्य लाल माकडांना मागे रेटण्यास समर्थ आहेच, पण चिनी साम्राज्यवादाचा धोका वाढतो आहे. अरुणाचल प्रदेशपासून 60 किलोमीटर अंतरावर न्यांगलूमध्ये चिनी सैन्याने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट स्थापन केले आहे.

पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये नियंत्रण रेषेपासून 80 किलोमीटरवर चिनी सैन्याने नव्याने बांधकाम सुरू केले आहे. हिमाचल प्रदेशच्या कौरिकजवळ आणि अरुणाचलच्या फिश टेल 1 आणि 2 जवळ चिनी सैन्य संशयास्पद हालचाली करताना दिसत आहे. उत्तराखंड सीमेनजीक तनजून ला येथे चिनी सैन्याने बंकर्स निर्माण करून बस्तान ठोकले आहे. याचा काय अर्थ घ्यायचा? पाकिस्तानला पुढे करून हिंदुस्थानी लष्कराला त्या सीमांवर गुंतवून ठेवायचे व इतर सीमांना कमजोर करून चिन्यांनी घुसखोरी करायची असे एकंदरीत धोरण दिसते.

Web Title: "What else to do when you forget the critical situation facing the country?"; Shiv Sena Target BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.