"जर अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन"; तृणमूलच्या खासदाराने दिलं जाहीर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:06 AM2021-08-04T11:06:02+5:302021-08-04T11:13:56+5:30

TMC Derek O Brien Challenge Amit Shah : तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

tmc mp derek o brien challenge amit shah and says i will shave my head if he comes in parliament | "जर अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन"; तृणमूलच्या खासदाराने दिलं जाहीर आव्हान

"जर अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन"; तृणमूलच्या खासदाराने दिलं जाहीर आव्हान

Next

नवी दिल्ली - 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पण पहिल्या दिवसापासून पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांकडून संसदेत गोंधळ सुरू आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे संसदेची कार्यवाही अनेकदा स्थगित करावी लागत आहे. पेगासस, कोरोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन (Derek O Brien) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. "जर अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन दिलं, तर टक्कल करून येईन" असं ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे. 

डेरेक ओ ब्रायन यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांना जाहीर आव्हान दिलं आहे. "विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. आम्हाला तीन मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. कृषी कायदे, अर्थव्यवस्था, रोजगार, महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा (पेगासस). सर्वात आधी पेगाससच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे" असं ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे. दिल्लीत 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असून जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. यावरून देखील ओ ब्रायन यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "मी आता हरवलेल्या व्यक्तींबद्दलची नोटीस काढणार आहे. मी नक्कीच हे करेन. जर आम्ही एक जबाबदार विरोधक असू, तर आम्ही बेपत्ता झालेल्या व्यक्तींबद्दल तक्रार दाखल करायला हवी" असं म्हटलं आहे. 

"मी केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत बघितलं नाही. पंतप्रधानांना संसदेत बघितलं नाही. त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्याला दिल्लीत नियुक्त करण्यात आलं. एका नऊ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मग केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन उत्तर द्यायला नको का?" असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच "जर अमित शहा राज्यसभा वा लोकसभेत आले आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेवर निवदेन केलं, तर मी टक्कल करून तुमच्या कार्यक्रमात येईन. मी अमित शहा यांना आव्हान देतोय, कारण ते पेगासस प्रकरणाच्या चर्चेपासून पळ काढत आहेत" असं डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: tmc mp derek o brien challenge amit shah and says i will shave my head if he comes in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.