Shivsena Pratap Sarnaik's demand to file a case against bjp Kirit Somaiya and his wife | किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी; "हे" आहे कारण

किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी; "हे" आहे कारण

मीरारोड - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व कुटुंबियांविरोधात आरोप करणारे किरीट सोमय्या हे त्यांच्या पत्नीशी संबंधित युवक प्रतिष्ठानने घेतलेल्या शौचालय बांधणीच्या ठेक्या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या संस्थेस शौचालय बांधणीची ४ कोटी रुपयांपेक्षा जास्तचे ठेके घेऊन कांदळवन आणि सीआरझेडमध्ये अनधिकृत बांधकामे केल्याने पर्यावरणाचा -हास प्रकरणी युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या व पती किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये युवक प्रतिष्ठानच्या वतीने १६ ठिकाणी शौचालयांचे बांधकाम करण्याचे कंत्राट घेण्यात आले होते. कामापोटी ४ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम सदर ठेकेदार संस्थेने घेतली. सदर शौचालयाची बांधकामे हे अनधिकृत असून कांदळवन व सीआरझेड क्षेत्रात तसेच खाडी पात्र परिसरात बांधण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने २००५ सालीच कांदळवन क्षेत्रात बांधकाम करण्यास बंदी घातलेली आहे. शिवाय देशाच्या संविधान आणि कायदे - नियमात देखील पर्यावरणाचे संरक्षण बंधनकारक असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच असताना बाबतच्या कोणत्याच रीतसर परवानग्या न घेता कांदळवन, सीआरझेड व खाडी पात्रात शौचालयांची अनधिकृत बांधकामे करून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे.

युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भारतीय जनता पार्टी पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या राजकिय शक्तीचा वापर करुन सार्वजनिक शौचालयांचे कंत्राट मिळवून तब्बल १६ ठिकाणी अशी बांधकामे केली. त्यांनी महानगरपालिका अधिका-यांची फसवणुक करुन खोटी कागदपत्रे सादर करुन शौचालयांची काही कोटी रुयांची बिले सुद्धा घेतली. 

विधिमंडळाच्या अधिवेशन दरम्यान आपण याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असता त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. महापालिका आयुक्त यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाकडे जो अहवाल सादर केला आहे त्या अहवालानुसार १६ ठिकाणी युवक प्रतिष्ठानने कांदळवन तसेच सी.आर.झेड क्षेत्रात शौचालयांची बांधकामे केली असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे आपण दिलेली तक्रार खरी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सरनाईक म्हणाले. 

युवक प्रतिष्ठानने कांदळवन आणि सी.आर.झेड क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयांचे अनधिकृत बांधकाम करणे, खोटी कागदपत्रे सादर करुन महानगरपालिकेच्या अधिका-यांची फसवणुक करुन करोडो रुपयांची बिले सादर करुन ते पैसे उकळणे अशाप्रकारचे मोठे अपराध केलेले असल्याचे सिद्ध होत आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन अधिका-यांवर दबाव टाकून आपल्या पत्नीच्या संस्थेस कंत्राट मिळवून दिले. त्याची करोडो रुपयांची देयके सुद्धा उकळली असल्याने किरीट व मेधा सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना केल्याचे सरनाईक म्हणाले.

 

English summary :
Shivsena Pratap Sarnaik's demand to file a case against bjp Kirit Somaiya and his wife

Web Title: Shivsena Pratap Sarnaik's demand to file a case against bjp Kirit Somaiya and his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.