...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:30 PM2022-01-14T14:30:17+5:302022-01-14T14:44:49+5:30

BJP Kirit Somaiya vs Shivsena Pratap Sarnaik: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते असं सरनाईक म्हणाले.

Shivsena Pratap Sarnaik replies to Kirit Somaiya allegation Vihang Garden unauthorized construction | ...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

googlenewsNext

ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बांधकाम एक इंचही अनधिकृत असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत शिवसेनेच्या जोरावर खासदार झालेल्या किरीट सोमय्या आणि भाजपवाल्यांनी अभ्यास करून बोलावे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांना दंड किती होता हे देखील माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना होती.आरक्षित भूखंडवर शाळेचे बांधकाम करून दिले. परंतु ती शाळा पालिकेने हस्तांतरित केली नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्टीने विहंग गार्डनचे बांधकाम बेकायदा ठरविले गेले. जितके चटई क्षेत्र मिळणार होते, तितकेच बांधकाम केले आहे. त्यामुळे इथे एक इंचही बेकायदा बांधकाम नाही. अशाचप्रकारे इतर विकासकांनी बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी केवळ सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे सरनाईक यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्या विरोधात भूमिका घेतली. तसेच राजीव यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली होती, असेही त्यांनी सांगितले.

सरकारमधील मंत्र्यानेच बातमी लीक केल्याचा दावा

महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांने जाणीवपुर्वक मंत्री मंडळात हा विषय येण्याआधी एका वृत्तपत्रला दिला होता. तरी देखील अजित दादांनी दंड माफ केला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. ठाण्यात अमराठी बिल्डरांना सर्व सुट दिली गेली मात्र प्रताप सरनाईक शिवसेनेचा आमदार आहे आणि मराठी उद्योजक आहे म्हणून जाणीवपुर्वक त्रास दिला गेला. मी आणि या इमारतीतील रहिवाशी हे मराठी आहेत. याचा विचारही कोणी केला नाही अशी खंत प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवली. 

काय आहे प्रकरण?   

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीचा दंड आणि त्या दंडावरील संपूर्ण व्याज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सरनाईक यांच्या कंपनीने बांधलेल्या या प्रकल्पातील पाच माळे अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन ठाणे महापलिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी या कारवाईचे आदेश दिले होते. त्यावेळी आर. ए. राजीव विरुद्ध सरनाईक या सामन्याचे विधिमंडळातही पडसाद उमटले. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी दंड आकारून बांधकाम नियमित करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा दंड आकारला होता. सरनाईक यांनी २५ लाख रुपये भरले मात्र दंडाची उर्वरित रक्कम न भरल्याने त्यावरील व्याज सुमारे एक कोटी २५ लाख झाले होते. सरनाईक यांनी महापालिकेची मंजुरी न घेता वाढीव बांधकाम केले असले तरी त्यांच्याकडे टीडीआर उपलब्ध होता. महापालिका आयुक्तांना त्यानुसार बांधकाम नियमित करता आले असते. मात्र त्यांनी तो प्रस्ताव नाकारला व कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या टीडीआरच्या आधारे हे बांधकाम नियमित करून दंड व व्याज माफ करून या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीने घेतला.

Web Title: Shivsena Pratap Sarnaik replies to Kirit Somaiya allegation Vihang Garden unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.