“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 08:39 AM2021-01-07T08:39:48+5:302021-01-07T08:41:21+5:30

Shiv Sena, Congress Rahul Gandhi News: विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे.

Shiv Sena Target BJP & Central Government over criticized Congress leader Rahul Gandhi | “लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

Next
ठळक मुद्देदेशातले भाजपचे नेते व त्यांना धनपुरवठा करणारे व्यापारी मंडळ हे पाक, साफ आहे व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन हे स्वच्छ आहे काय?एखादी लस राजकीय पोटदुखी, राजकीय सूडबुद्धीच्या आजारावरदेखील काढता आली असती तर किती बरे झाले असते!जोपर्यंत राजकीय मालक इशारे करत नाहीत तोपर्यंत हे निष्ठावान लोक उगाच कुणाच्या घरी जाऊन दारावर टकटक करणार नाहीत.

मुंबई - ‘‘राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत’’ असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.  

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावे लागेल. काही काळासाठी गांधी दूर जाताच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला. आता पुन्हा गांधी येत आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही असा आरोपही शिवसेनेने भाजपावर केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होत आहेत. त्याच वेळी रॉबर्ट वढेरा यांच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण घेऊन आयकर विभागाचे अधिकारी घरी गेले. आयकर विभाग, ईडी वगैरे संस्था या कमालीच्या प्रामाणिक आहेत. त्यांच्या राजकीय निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही.

जोपर्यंत राजकीय मालक इशारे करत नाहीत तोपर्यंत हे निष्ठावान लोक उगाच कुणाच्या घरी जाऊन दारावर टकटक करणार नाहीत. त्यामुळे या मंडळींना दोष देण्यात अर्थ नाही. राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत व त्याच दुखण्यातून यापुढे बरेच काही घडणार आहे.

कोविड-19 वर वैज्ञानिकांनी लस शोधून काढली तरी एखादी लस राजकीय पोटदुखी, राजकीय सूडबुद्धीच्या आजारावरदेखील काढता आली असती तर किती बरे झाले असते! गांधी परिवारातील सदस्यांकडून जर खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही, पण जेव्हा अशा तर्हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि ‘‘फास आवळला जात आहे’’ असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण स्पष्ट होते.

रॉबर्ट वढेरा हे भाजपच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य राहिले, पण गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्रात त्यांचे सरकार आहेच व गांधी परिवाराविरोधात सर्व आयुधे वापरून झाली आहेत. हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्य़ा प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे.

राजकीय विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. या उत्खननात हाती लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जाते. त्यामुळे लोकांना या बोंबलण्यात रस राहिलेला नाही. मग देशातले भाजपचे नेते व त्यांना धनपुरवठा करणारे व्यापारी मंडळ हे पाक, साफ आहे व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन हे स्वच्छ आहे काय?

मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ‘ईडी’ वगैरे संस्थांकडे ज्या काही भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत व ‘ईडी’ अजून कारवाई का करत नाही? असे ज्यांच्याविषयी हे महाशय विचारत होते ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची जणू सुरनळीच केली काय, ते राष्ट्रीय हितासाठी समजणे गरजेचे आहे.

त्यांची प्रकरणे तर ताजी आहेत व वढेरांपेक्षा भयंकर आहेत. परदेशातून काळे धन आणायची गर्जना तर पंतप्रधान मोदी यांनीच केली आहे. या काळय़ा धनवाल्यांनी ‘पीएम केअर्स फंडा’त गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे?

विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे.

Web Title: Shiv Sena Target BJP & Central Government over criticized Congress leader Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.