देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 07:37 AM2020-09-06T07:37:23+5:302020-09-06T07:40:53+5:30

कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम.

Shiv Sena Sanjay Raut Target Finance Minister Nirmala Sitaraman over Economy Situation of India | देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही?कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? कोरोना महामारी व कोसळलेली अर्थव्यवस्था ही देवाची इच्छा आहे. मग सरकारची, सैन्याची गरज काय? फुले-आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्र देव आणि धर्म मानतो, पण अंधश्रद्धेला मूठमाती देतो.

मुंबई -  देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था म्हणजे देवाची करणी अशी एक पुडी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोडली. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचे हे कसले हिंदुत्व? देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा? स्वतःच्या अपयशाचे खापर देवावर फोडणे हाच हिंदुत्वाचा अपमान आहे. कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. आता देवच कोरोनाग्रस्तांना बरे करेल. मग ती लस तरी का शोधायची? हा प्रश्नसुद्धा आहेच. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्य़ा देशाला शोभणारे नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

तसेच फुले-आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्र देव आणि धर्म मानतो, पण अंधश्रद्धेला मूठमाती देतो. देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीन लडाख परिसरात घुसला आहे व मागे हटायला तयार नाही हीसुद्धा आता देवाचीच करणी म्हणायला हवी. जसा राजा तशी प्रजा हे नेहमीच म्हटले जाते. प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हेसुद्धा सत्यच आहे. कोरोना म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असे सरकारी पातळीवर जाहीर होताच प्रजा तरी कशी मागे राहील? बिहारमधल्या एका गावातील महिलांनी वेशीबाहेर कोरोना देवीचे मंदिर उभे केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील ‘बार्शी’ येथे कोरोना रोखण्यासाठी कोरोना देवीचीच स्थापना करण्यात आली. कोरोना देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडी-बोकडाचा नैवेद्य दिला जातोय असंही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊतांची रोखठोक भूमिका

देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलणे हे आता पाप ठरत आहे. आपले पंतप्रधान मोदी सर्वच विषयांवर त्यांचे मन मोकळे करीत असतात, पण कोसळलेली अर्थव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना ते स्पर्श करायला तयार नाहीत. नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे. पण या पानिपताचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरळ देवावर फोडले.

कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. कोरोना देवीची स्थापना करणाऱ्य़ा ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण कोरोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणाऱ्य़ा निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही?

‘कोरोना’ काळात लोकांच्या नोकऱ्य़ा गेल्या. पगार थकले. व्यवसाय-उद्योग बंद पडले. लोकांनी आपली घरे, संसार कसे चालवायचे? याची तजवीज देवांनी नाही तर सरकारमध्ये बसलेल्या माणसांनी करायची असते. जगातील अनेक देशांतील सरकारांनी आपापल्या जनतेची ही व्यवस्था केली आहे.

‘नुसते घरात बसा. घरून कामे करा’ असे सांगून घराचे गाडे कसे चालणार? सुलक्षणा वराडकर या मुंबईत पत्रकारिता केलेल्या महिला सध्या ब्राझीलमध्ये राहतात व संशोधन कार्य करतात. त्यांच्या देशासंदर्भात जी माहिती त्यांनी समाज माध्यमांवर दिली ती ‘ऍक्ट ऑफ गॉड’वाल्या निर्मलाबाईंनी समजून घेतली पाहिजे.

सुलक्षणा सांगतात, ‘लॉक डाऊन काळात माझ्या बचत खात्यात माझे नसलेले दीड लाख रुपये जमा झालेले दिसले. हे पैसे सरकारकडून जमा झालेले समजले. पण लॉक डाऊन काळात प्रत्यक्ष बँकेत जाता येत नव्हते. त्यामुळे नीट कळत नव्हते की हे इतके पैसे माझ्या बचत खात्यावर का जमा झालेत? सरकारने माझ्यासारख्या नवख्या संस्कृती – संशोधकाला, एका परदेशी पत्रकाराला ही रक्कम परस्पर का दिली?

मी बँकेत जाऊन चौकशी केली. स्थानिक मित्र-मैत्रिणींना विचारले. तेव्हा समजले, बोल्सनारो सरकारने आपल्या देशातील जनतेला ही अशी आर्थिक मदत कोविड काळात केली आहे. पण परदेशी नागरिक असूनही मला कोणतीही अर्ज-विनंती न करता सरकारने एक अख्खा अधिकचा पगार कोविड काळात मदत म्हणून दिला आहे.’

यावर वराडकर पुढे सांगतात ते महत्त्वाचे, ‘देश म्हणजे फक्त राष्ट्रगीत नाही, झेंडा नाही. देश म्हणजे जनतेची काळजी. कष्टकरी समाजाची, लेखकांची, संशोधकांची काळजी.’ ब्राझीलप्रमाणे अनेक देशांनी कोविड काळात जनतेला अशी मदत केली आहे. त्यांच्यासाठी ही देवाची करणी वगैरे नसून माणसांवर आलेले संकट आहे व लोकांना आर्थिक आधार देणे हे सरकारचे काम आहे.

आधी कोरोना व नंतर आर्थिक घसरण हे संकट आहेच. पण कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? हिंदुस्थानात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’चा आकडा 23.9 टक्के एवढा कोसळला. ही पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. त्याचे खापर देवावर फोडणे हा मानसिक गोंधळ आहे.

रोग हा दैवी प्रकोपात मोडतो हे एकविसाव्या शतकात कोणी बोलत असेल तर आपण अजून जंगल युगात वावरत आहोत. ‘ओ माय गॉड’ चित्रपट ज्यांना आठवतोय त्याचे कथानक ‘Act of God’ भोवतीच गुंफले आहे. भूकंपाच्या धक्क्यात कानजीभाईंचे पुरातन वस्तूंचे दुकान उद्ध्वस्त होते. तो सरकारी यंत्रणेकडे मदतीसाठी चपला झिजवतो.

‘हे दैवी संकट’ म्हणून मदत, विमा नाकारला जातो. तेव्हा कानजीभाई न्यायालयात प्रत्यक्ष देवावरच खटला गुदरतो व नुकसानभरपाईचा दावा ठोकतो. सर्वच धर्मांचे देव, अल्ला, जिझसचे ठेकेदार हे कानजीभाईंच्या विरोधात उभे राहतात व शेवटी कानजीभाईंचा विजय होतो. आज देशात असंख्य कानजीभाई जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांना कोरोना देवीची मदत नाही आणि अर्थमंत्री निर्मलादेवीचेही सहाय्य नाही!

कोरोना महामारी व कोसळलेली अर्थव्यवस्था ही देवाची इच्छा आहे. मग सरकारची, सैन्याची गरज काय? देवच सर्वकाही पाहून घेईल. देशात गेल्या सहा महिन्यांत 14 कोटी लोकांच्या नोकऱ्य़ा गेल्या. ही सर्व कुटुंबे यापुढे अन्नान्नदशा करणार आहेत. शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे तो वेगळाच.

कामगार वर्गाचे हक्क आणि ताकद या काळात संपली आहे. स्वातंत्र्य लढय़ात मजबुतीने उतरलेला श्रमिक वर्ग इतका लाचार कधीच झाला नव्हता. उलट देशासाठी त्याग करण्याची जबाबदारी याच श्रमिकांवर येऊन पडली आहे. हजारो वर्षांपूर्वी ऑरिस्टॉटलने म्हटले होते की, ‘जोडे वापरणाऱ्य़ालाच ते कुठे बोचतात ते कळते.’ जोडे वापरणारी जनता, दुःख भोगणारा सर्वसामान्य माणूस. मग ही दुःखे राज्यकर्त्या नोकरशाहीला, मग ती पक्षाची असो वा सरकारची, कळणारच कशी? आजही काही स्थिती वेगळी नाही.

पण हा सर्व दैवी प्रकोप आहे. त्यामुळे सरकारवर ठपका ठेवून काय उपयोग? पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता?

विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणाऱ्य़ा भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या 70 वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई?

Web Title: Shiv Sena Sanjay Raut Target Finance Minister Nirmala Sitaraman over Economy Situation of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.