“घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरातील घटनेवर तुमची थोबाडे बंद का?”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 07:26 AM2020-10-30T07:26:46+5:302020-10-30T07:30:58+5:30

Munger Violence, Shiv Sena Target BJP, Hinudtva News: मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे.

Shiv Sena attacks on BJP over Hindutva & Munger Violence Incident at Bihar | “घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरातील घटनेवर तुमची थोबाडे बंद का?”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

“घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरातील घटनेवर तुमची थोबाडे बंद का?”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देहिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता.घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरात दुर्गापूजा मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारावर तुमची थोबाडे बंद का आहेत?बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही.हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. अशा घटनांचा तपास पोलीस निःपक्षपातीपणे करत असल्याचे हवाले देतात. ‘मुंगेर’सारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो! अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.

तसेच आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

बिहारात विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ‘‘तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!’’ गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारात नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसतोय.

मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे. दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला व पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा फक्त 18 वर्षांचा तरुण त्यात मारला गेला.

दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. दुर्गापूजेत गोळीबार म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता. प. बंगाल, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती.

गेला बाजार या गोळीबाराची सीबीआय चौकशी तरी कराच या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेले असते. पण काय हो घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरात दुर्गापूजा मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारावर तुमची थोबाडे बंद का आहेत?

मुंगेरच्या रस्त्यावर भर मिरवणुकीत दुर्गा प्रतिमेची खेचाखेच पोलिसांनी केली. त्या खेचाखेचीत बेगडी हिंदुत्ववाद्यांची पीतांबरे अद्याप सुटली कशी नाहीत? की मुंगेरात दुर्गापूजेत गोळीबार झाला म्हणून महाराष्ट्र किंवा प. बंगालचे राज्य बरखास्त करा, असे त्यांचे सांगणे आहे?

महाराष्ट्रातील पालघरमध्ये ‘लॉक डाऊन’ काळात दोन साधू महाराजांची हत्या झाली. हत्या जमावाने केली. त्यात पोलीसही जखमी झाले, पण त्या हत्येने महाराष्ट्रातील साधुवाद, हिंदुत्व वगैरे सगळं संपलं, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला हिंदुत्वाशी काहीच घेणे-देणे उरले नसून शिवसेना आता ‘सेक्युलर’ झाली असल्याची आवई उठवली.

काही भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी तर त्या दुर्दैवी साधूंची ढाल पुढे करून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले. आज मुंगेरला दुर्गापूजेवर पोलिसी गोळीबार होऊनही हे भुंकणारे व किंकाळय़ा मारणारे थंडच आहेत. नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही.

मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असे या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. एकतर बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही.

मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले. संपूर्ण बिहारवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत. महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांत हे असे काही दुर्दैवाने किंवा अपघाताने घडले की, यांचे हिंदुत्व दक्ष आणि सावधान होते. उत्तर प्रदेशात अबलांवर बलात्कार व खून झाले, साधू आणि पुजाऱ्यांना मंदिरातच निर्घृणपणे मारले गेले. हरयाणात एका मुलीला भररस्त्यात ठार केले. त्या प्रसंगास ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवून मोकळे झाले.

Web Title: Shiv Sena attacks on BJP over Hindutva & Munger Violence Incident at Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.