"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 07:28 AM2020-09-12T07:28:23+5:302020-09-12T07:32:19+5:30

बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

Shiv Sena attacked the opposition for teaches Maharashtra national unity over Kangana Ranaut Issue | "हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार

"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार

Next
ठळक मुद्देलढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमानमुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे

मुंबई -  शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर प्रहार केला आहे.

लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱयांनी ठेवलेच पाहिजे. महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे.

प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच.

मुंबई महाराष्ट्राचीच आहे व राहणार, असे घटनाकार डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान!

डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्टय़ा मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जसे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांसारखे शूर होते तसे काही अस्तनीतील निखारेही होतेच. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळायची राहिली काय?

बॉलिवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत.

मुंबईच्या सिनेसृष्टीत, संगीतात नशीब अजमावयास येणारे आधी फुटपाथवर पथारी पसरतात. पण नशिबाचा तारा एकदा चमकला की, याच मुंबईच्या जुहू, मलबार हिल, पाली हिल भागात आपले इमले उभे करतात. पण एक नक्की, हे सगळे लोक सदैव मुंबई-महाराष्ट्राशी कृतज्ञच राहिले. मुंबईच्या मातीशी त्यांनी कधी बेइमानी केली नाही.

दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’पर्यंतचे किताब मिळाले. मुंबईत कोणीही यावे आणि आपल्या हरहुन्नरीपणावर नशीब अजमावावे. मुंबईचा फिल्मी उद्योग आज लाखोंना रोजीरोटी देत आहे. सध्या येथे ‘खानावळ’ आहे अशी टीका होते.

तशी कधी मराठी, तर कधी पंजाबी मंडळींची चलती होतीच. पण मधुबाला, मीनाकुमारी, दिलीप कुमार, संजय खानसारख्या दिग्गज मुसलमान कलावंतांनी पडद्यावरील आपली नावे ‘हिंदू’ केली. कारण तेव्हा येथे धर्म शिरला नव्हता, तर कला-अभिनयाचेच नाणे खणखणीतपणे वाजवले जात होते.

घराणेशाहीचे वर्चस्व आज आहेच. तसे तेव्हाही होतेच. कपूर, रोशन, दत्त, शांताराम अशा खानदानांतून पुढची पिढी समोर आली आहे, पण जे उत्तम काम करत होते तेच टिकले. मुंबईने फक्त गुणवत्तेचा गौरव केला. राजेश खन्नाला कोणतेच घराणे नव्हते. जितेंद्र, धर्मेंद्रलाही नव्हते. पण त्यांच्या मुला-नातवांना ते घराणे असेल तर बोटे का मोडायची?

घराणी संगीतात आहेत. दिग्दर्शनातसुद्धा आहेत. पण यापैकी प्रत्येकाने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. नव्हे, मुंबईच्या जडणघडणीत योगदान दिले. पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱयांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले. मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे.

Web Title: Shiv Sena attacked the opposition for teaches Maharashtra national unity over Kangana Ranaut Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.