"...हा तर राहुल गांधींच्या विरोधातील डाव, काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 03:06 PM2020-12-11T15:06:49+5:302020-12-11T15:22:59+5:30

Congress Sanjay Nirupam And Rahul Gandhi : दिल्लीत सध्या शरद पवार हे केंद्रस्थानी असतानाच शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Sanjay Nirupam Tweet on UPA Chairman And Congress Rahul Gandhi | "...हा तर राहुल गांधींच्या विरोधातील डाव, काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट"

"...हा तर राहुल गांधींच्या विरोधातील डाव, काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट"

Next

मुंबई - दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. केंद्राने नव्याने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनाला सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी युपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. दिल्लीत सध्या शरद पवार हे केंद्रस्थानी असतानाच शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपलं मत मांडलं आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून  या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. "शरद पवार यांच्याबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत 23 जणांच्या सह्या असलेलं पत्र सोनिया गांधी यांना लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याचा अभाव असल्याचा शोध लावण्यात आला होता. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे" असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवशी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ''मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही'', असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

भाजपाविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत होते. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा होती. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. 

देशाचं नेतृत्व करण्याची शरद पवारांमध्ये क्षमता - संजय राऊत

युपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल"  असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

Read in English

Web Title: Sanjay Nirupam Tweet on UPA Chairman And Congress Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.