राखीव मतदारसंघात प्रस्थापितांचीच झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:11 AM2019-04-20T04:11:59+5:302019-04-20T04:13:15+5:30

शिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या.

Resistance in Reserved Constituency | राखीव मतदारसंघात प्रस्थापितांचीच झुंज

राखीव मतदारसंघात प्रस्थापितांचीच झुंज

Next

- शिवाजी पवार
शिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या. यंदा मात्र कोणतीही लाट नसताना स्थानिक प्रश्नांवर निवडणूक होत आहे. उमेदवारांच्या पात्रतेवर व कामावर प्रचारात चर्चा होत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यातच एकप्रकारे लढाई आहे.
२००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत रिपाइं नेते रामदास आठवले यांना नकारात्मक प्रचारामुळे धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. मागील खेपेला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे मोदी लाटेवर अवघ्या तेरा दिवसांमध्ये खासदार झाले. मात्र नंतर ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना दिलेली चालना, मंजूर केलेल्या आठ कृषी उत्पादक कंपन्या तसेच पासपोर्ट कार्यालय या केलेल्या कामांचा ते दाखला देत आहेत.
काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रारंभी राधाकृष्ण विखे यांनीच प्रयत्न केले. मात्र, विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना अहमदनगरची जागा राष्टÑवादीने न सोडल्यामुळे विखे यांनी कॉंग्रेसमधून अंगच काढल्यासारखे आहे. सुजय यांनी ‘मातोश्री’वर जात लोखंडे यांना मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे हेही लोखंडेंसोबत राहतील. थोरात यांनी कांबळे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळवून देत विखेंची कोंडी करुन टाकली. कांबळेंसाठी त्यांनी कंबर कसली आहे. शिर्डी मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला तर त्याचे श्रेय थोरात यांना जाईल हे विखे ओळखून आहेत. त्यामुळे विखे लोखंडेंसाठी तर थोरात कांबळे यांच्यासाठी जोर लावत आहेत.
दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या गैरहजेरीत प्रथमच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांची कसोटी आहे. भाजपचे बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे, वंचित आघाडीचे संजय सुखदान व भाकपचे कॉ. बन्सी सातपुते हे रिंगणात आहेत. ते किती प्रभावी ठरणार यावर गणिते अवलंबून आहेत.
निळवंडेच्या कालव्यांना चालना, वैद्यकीय सुविधा केंद्र, आठ कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य तसेच संत रोहिदास कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षात पाणी हाच आमचा अजेंडा राहील.
-खा. सदाशिव लोखंडे, शिवसेना
>आपण सर्वसामान्य कुटुंबातील असून जनतेची सेवा करणे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आलो. नगरसेवक पदापासूनचा अनुभव पाठिशी आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. आपण स्थानिक व सतत जनतेला उपलब्ध आहोत. यावेळी येथे कॉंग्रेसच जिंकणार.
-आ.भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस
कळीचे मुद्दे
ग्रामीण मतदारसंघ व साखर कारखानदारीवर अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पाण्याचा मुद्दा कळीचा बनला आहे.
लोकसंपर्काचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. लोकांच्या सुख दु:खात सहभागी होण्याचे व नेहमी उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले जात आहे.

Web Title: Resistance in Reserved Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.