Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 12:00 PM2021-05-16T12:00:34+5:302021-05-16T12:25:52+5:30

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे

Rajiv Satav: "Childhood friendship is still alive"; Rajiv Satav memories by his Friends | Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले

Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले

Next
ठळक मुद्देराजीव यांचे आजोळ पुण्यात असल्यानं मोठा मित्र परिवार: शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातसिटीपोस्टमध्ये महाराष्ट्र तरूण मंडळाजवळ राजीव सातव यांचे मामा प्रताप वाघ यांचे घर आहे. काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी आल्यानंतर त्यांनी समीर यांना महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवून दिली

राजू इनामदार

पुणे – काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानं सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे. पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सावत यांचे रविवारी पहाटे निधन झाले. खरंतरं पुणे हे राजीव सातव यांचे आजोळ होते.

राजीव सातव यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाल्याने पुण्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. सिटीपोस्टमध्ये महाराष्ट्र तरूण मंडळाजवळ राजीव सातव यांचे मामा प्रताप वाघ यांचे घर आहे. मंदार वाघ त्यांचे मामेभाऊ आहेत. शालेय शिक्षणासाठी काही वर्षे राजीव पुण्यात राहिले होते. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातही ते होते. तिथे असतानाच त्यांच्या सामाजिक कामाची मुहुर्तमेढ झाली.

राष्ट्रीय सेवा योजनेत ते काम करत असताना सुसमध्ये त्यांचे निवासी शिबिर होते. आताचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे त्यांचे याच गावातील मित्र झाले. ती मैत्री त्यांनी अजून कायम ठेवली होती. जेव्हा कधीही राजीव सातव पुण्याला येत तेव्हा अगदी आवर्जून ते भेट घ्यायचे असे चांदेरे यांनी सांगितले. समीर शेख हे सातव यांचे बुधवार पेठेतील लहानपणीचे मित्र आहेत. त्यांच्याबरोबरही त्यांनी दोस्ताना कायम ठेवला होता. काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी आल्यानंतर त्यांनी समीर यांना महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. एक उमदा तरूण राजकारणी गमावला असे शब्दात चांदेरे व शेख यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला

राजीव सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील एक दुवा हरपला असल्याची भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

सोमवारी मूळगावी पार्थिवावर अंत्यसंस्कार

राजीव सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच स्थानिक काँग्रेस नेते मोहन जोशी, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे हे यावेळी उपस्थित होते. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

Web Title: Rajiv Satav: "Childhood friendship is still alive"; Rajiv Satav memories by his Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.