राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:00 AM2021-01-08T07:00:37+5:302021-01-08T07:01:08+5:30

विरोधी पक्षनेते विरुध्द स्थायी समिती अध्यक्ष सामना रंगला

quarrels broke out in the state, Sena-Congress oppose Mumbai Municipal Corporation | राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पूर्वसूचना न देता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिल्याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहॉ सिद्दिकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवली आहे. मात्र काँग्रेसने यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना जबाबदार धरले आहे. तर काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधले जात असल्याचे प्रत्‍युत्तर अध्यक्षांनी दिले आहे, त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.


नियमानुसार पूर्वकल्पना न देता सलग तीन महिने सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकाचे पद रद्द ठरते. त्यानुसार २७ ऑक्टोबरपासून महासभेला गैरहजर राहिलेल्या सिध्दीकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवून ५ जानेवारी रोजी होणाऱ्या महासभेत उपस्थित न राहिल्यास आपले नगरसेवकपद रद्द होऊ शकते, अशी सूूूचना दिली. परंतु, वैयक्तिक कारणाने गैरहजर राहत असल्याचे चिटणीस विभागाला दिलेले पत्र त्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडले नाही. सिध्दीकी या मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी आहेत. हे काँग्रेस विरोधात षडयंत्र असून स्थायी समिती अध्यक्षांच्या दबावाखाली काम सुरू आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला.
तसेच चिटणीस यांना तात्काळ पदावरून दूर करण्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना काँग्रेसने पत्रही दिले. मात्र अशा प्रकारचे स्मरणपत्र काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन आणि भाजपच्या तीन नगरसेवकांना पाठविण्यात आले आहे. तरीही या प्रकरणात संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे, असे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. सिध्दीकी यांनी १५ दिवसांच्या रजेसाठी पत्र दिले होते. महासभेच्या पटलावर एक महिन्यांच्या रजेचे पत्र पाठवले जाते असल्याने त्यांचे पत्र पटलावर मांडण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले.


मुंबईच्या हितासाठी आपण बोलतच राहणार. मनमानी कारभार चालू देणार नाही. काँग्रेसच्या सदस्यांना नाहक त्रास दिला जात आहे. असा प्रकार खपवून घेणार नाही.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई पालिका


गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते शिवसेनेवर नाहक आरोप करीत आहेत. ते, काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधत आहेत, असेच दिसते. राजकीयदृष्टीने वैयक्तिक हितासाठी ते आरोप करीत आहेत.
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: quarrels broke out in the state, Sena-Congress oppose Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.