एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:47 AM2020-10-09T02:47:40+5:302020-10-09T06:49:05+5:30

१० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले.

prakash ambedkar slams mp udayan raje bhosale and sambhaji raje chhatrapati | एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

googlenewsNext

पुणे : ‘‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्यघटना कळत नसताना त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले?,’’ असा जोरदार हल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चढवला. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून १० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले.

‘‘एमपीएससी परीक्षा शासनाने म्हटले म्हणजे होणार. ‘आम्ही होऊ देणार नाही,’ ही भूमिका योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊ द्या. आरक्षण घटनेच्या आधारे आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. ही कायदेशीर बाब आहे,’’ असे म्हणत अ‍ॅड. आंबेडकर यांनी छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या मतालाही विरोध दर्शवला. गुरुवारी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

दोन्ही ‘राजां’चा बंदला पाठिंबा असल्याचे कुठेही वाटले नाही. एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर; पण ते आरक्षण सोडून इतर मुद्द्यांवरच जास्त भर देत आहेत, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. कोणालाही अंगावर घ्यायला मी घाबरत नाही. आरक्षण घटनेने दिले आहे. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्याशी उघड भांडण करायचे आहे का? असाही प्रश्नही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

उदयनराजेप्रेमींकडून प्रकाश आंबेडकर यांचा निषेध
सातारा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या टीकेचा उदयनराजेप्रेमी यांच्याकडून सातारा शहरामध्ये जोरदार निषेध करण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, की आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. उदयनराजे हे आमचे आदर्श आहेत. प्रकाश आंबेडकरांसारख्या अभ्यासू व्यक्तीकडून हे अपेक्षित नव्हते.

ओबीसी कोट्यातून आरक्षण मागू नये
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: prakash ambedkar slams mp udayan raje bhosale and sambhaji raje chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.