प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा हवा; काँग्रेसमध्ये सूूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:59 AM2021-01-07T06:59:13+5:302021-01-07T06:59:54+5:30

Congress, Balasaheb Thorat: पक्ष प्रभारींनी जाणून घेतली मते

OBC face as state president; demand in Congress | प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा हवा; काँग्रेसमध्ये सूूर

प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा हवा; काँग्रेसमध्ये सूूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना वेग आला असून, प्रदेशाध्यक्ष बदलायचे असतील तर नवा चेहरा ओबीसी समाजाचा द्यावा, असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.


काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत मते जाणून घेतल्यानंतर ते पक्षश्रेष्ठींना याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.  पाटील हे सध्या मुंबईत असून, त्यांनी मंगळवारी रात्रीपासून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी आधीच दर्शविली आहे. तरुणांना संधी मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे थोरात यांनी म्हटले होते. पाटील यांनी नेत्यांशी केलेल्या चर्चेत प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावांबाबत चाचपणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.


प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच महसूलमंत्री, तसेच पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेतेपद अशी तीन महत्त्वाची पदे आहेत. त्‍यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वेगळ्या व्यक्‍तीकडे देण्यात यावी, अशी चर्चा काँग्रेस पक्षात सुरू झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनीदेखील त्‍याला आपली हरकत नसून, बदल करायचाच असेल तर नवीन आणि तरुण चेहऱ्याच्या हाती ही जबाबदारी सोपवावी, अशी भूमिका मांडली आहे.


एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह पृथ्‍वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष निवडायचा असेल तर तो बिगर मराठा समाजातील असावा असा एक सूर पक्षात आहे.  सध्या काँग्रेससह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत. काँग्रेसने मराठा समाजाला मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व दिलेले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी नेत्याचा विचार व्हावा, अशी चर्चा आहे. त्यादृष्टीने खा. राजीव सातव विधानसभाध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार विजय वडेट्टीवार या नेत्‍यांची नावे चर्चेत आहेत. 

तूर्त बदल नको
n सध्या स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्‍यामुळे सध्या नेतृत्‍वबदल नको, असाही एका गटाचा सूर आहे. 
n विशेषत: मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांनी थोरात यांना बदलू नये, असा आग्रह धरल्याचे समजते.

Web Title: OBC face as state president; demand in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.