भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:15+5:302020-12-14T06:51:35+5:30

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे.

no Unanimity in bjp leaders of maharashtra giving advantage to state government | भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

Next

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

विधान परिषद निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला. तिकिटे नेत्यांनी वाटली की वाटून घेतली हा प्रश्नच आहे. नागपूर, पुण्याची जहागिरी वाटून घेण्याच्या नादात इलेक्टिव्ह मेरीट असलेले उमेदवार दिले गेले नाहीत. ते दिले असते तर चित्र वेगळे राहिले असते. गोविंदाचे एक गाणे होते, मै चाहे ये करू, चाहे वो करू, मेरी मर्जी.. भाजपमध्ये सध्या तसे चालले आहे. पक्षातील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत. कोरसमध्ये कोणीही गात नाही. भावगीताला डिस्कोचे संगीत दिले तर ते बेसूर होणारच. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे वादग्रस्त विधाने करण्याचे थांबलेले नाहीत. रामदास कदम यांनी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. त्यावेळी कदम हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. 



कल्याणच्या सभेत फडणविसांनी सुनावले,  'भाई तुमचा पगार किती अन‌् तुम्ही बोलता किती?'. भाजपमधील काही नेत्यांनादेखील हे सांगण्याची आवश्यकता आहे. आपण एकटेच बोलण्यात प्रवीण आहोत असे दरेकरांना वाटते, पण त्यांच्यामुळे पक्षाला किती फायदा झाला याचा अभ्यास केला पाहिजे. सुमार नेत्यांची सद्दी संपली पाहिजे किंवा त्यांना आवर तरी घातला पाहिजे. प्रसाद लाड यांच्यासारखी माणसे भाजपचं तत्वज्ञान सांगू लागतात तेव्हा आंब्याच्या झाडाला लिंबू लागल्यासारखे वाटते.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये जे काही अंतर्गत वाद, एकमेकांना फटाके लावणे, राजीनाराजी असे प्रकार घडले त्याचा हिशेब केला तर आत्मचिंतनाला भरपूर संधी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची परवा जयंती झाली. भटाब्राह्मणांचा पक्ष ओबीसीपर्यंत नेणारा हा नेता होता. मुंडे-महाजन हे सत्तेशिवाय मोठे होते. सत्तेत कोणीही मोठे असते. ती गेल्यानंतरही मोठेपण, दबदबा, दरारा तसाच कायम राहिला तर ते नेतृत्वाचे खरे यश असते. भाजपमध्ये फडणवीस, मुनगंटीवार, पंकजा मुंडे असे ताकदीचे नेते आहेत, पण एकीचा आणि संवादाचा अभाव दिसतो. भाजपचे १०५ आमदार आहेत. 



अनेक महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये आजही भारतीय जनात पक्षाची सत्ता आहे. पक्षाचे केंद्रात सरकार आहे. फडणवीस यांच्यासारखा हेडऑन घेऊ शकणारा नेता आहे. संपूर्ण विरोधी पक्षाची स्पेस आज भाजपकडे आहे, असे असूनसुद्धा भाजप विरोधी पक्षाच्या मन:स्थितीत पूर्णतः गेलेला दिसत नाही. ऑपरेशन लोटस हा शब्द आतापर्यंत खूप वेळा वापरला गेला आहे. महाराष्ट्रात 'ऑपरेशन विदिन लोटस' करण्याची गरज आहे हे निश्चीत.



ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र!
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सत्तेतील तिन्ही पक्ष ही लढत झाली आणि त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली. आता राज्यातील १४२५८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीतही अशीच लढत राहिली तर ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असेल. भाजपची कसोटी लागेल. ग्रामीण महाराष्ट्रावर पकड कोणाची याचा फैसला यानिमित्ताने होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला अमरावतीत दगाफटका झाला. ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल असे दिसते.

पवारसाहेब, शंकरबाबा, अनिल देशमुखांचे कन्यादान
अमरावती जिल्ह्याच्या वझ्झरमध्ये शंकरबाबा पापळकर नावाचा एक अवलिया राहतो.  अनेक अनाथ मुलामुलींची लग्न त्यांनी लावून दिली. त्यांच्या २४ व्या मानसकन्येचा म्हणजे अनाथ वर्षा या तरुणीचा विवाह त्यांच्याच संस्थेतील समीर या अनाथ तरुणाशी २० डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आरती देशमुख वर्षाचे कन्यादान करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या घरी हे लग्न होणार आहे. शंकरबाबांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी मुंबईत आपल्या घरी बोलावले. अनिलबाबू त्यांना घेऊन गेले. पवार साहेबांनी तासभर चर्चा, विचारपूस केली. अनाथांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा त्यांनी शंकरबाबांकडून ऐकून घेतल्या. तुमच्या संस्थेत नक्की येईन असे ते म्हणाले. संत गाडगेबाबांची परंपरा आपल्या लोकसेवेतून चालविणारे शंकरबाबा भारावून गेले.
yadu.joshi@lokmat.com

Web Title: no Unanimity in bjp leaders of maharashtra giving advantage to state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.