बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप, भाजपाला जोरदार धक्का?; JDU आमदाराचा खळबळजनक दावा

By प्रविण मरगळे | Published: January 8, 2021 10:31 AM2021-01-08T10:31:53+5:302021-01-08T10:34:19+5:30

Bihar Political Update News: मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे.

Nitish Kumar will quit as Bihar CM after 6 months, Tejashwi Yadav will form government: JD(U) MLA | बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप, भाजपाला जोरदार धक्का?; JDU आमदाराचा खळबळजनक दावा

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप, भाजपाला जोरदार धक्का?; JDU आमदाराचा खळबळजनक दावा

Next
ठळक मुद्देबिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील?जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता

पटणा – अलीकडेच बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, यात भाजपा आणि नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं काठावरचं बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली, या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. जास्त जागा जिंकूनही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र सत्तेची चावी स्वत:कडे ठेवली. मात्र आता बिहारच्या राजकारणात पुन्हा एक मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं आहे. मंडळ यांच्या विधानामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं बोललं जातं आहे. बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या NDA मध्ये सध्या धुसफूस वाढली आहे. यातच ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव राज्यात सत्ता स्थापन करतील असा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे थंड असलेले राजकीय वातावरण पेटलं आहे. या क्लीपच्या व्हायरल झाल्यानंतर आमदार गोपाल मंडल यांची बदनामी झाली. यामुळे त्यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. माध्यमासमोर बोलताना गोपाल मंडल म्हणाले की, नितीश कुमार हे दबंग मुख्यमंत्री आहेत. ते ६ महिन्यानंतर पायउतार होतील, त्यानंतर राज्यात तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असा दावा त्यांनी केला.

गोपाल मंडल यांनी स्वत:लाही दबंग आमदार असल्याचा दावा केला. आम्ही आदेश काढून कोणालाही जिंकवू शकतो, रोहित माझा छोटा भाऊ आहे, जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता. मी १४ निवडणूक पाहून सांगू शकतो कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. इतकचं नाही तर ऑडिओ क्लीप व्हायरल होण्याचं खापर गोपाल मंडल यांनी भाजपाचे आमदार शैलेंद्र यांच्यावर फोडलं.

काँग्रेसचे आमदार फुटण्याचा माजी आमदाराचा दावा

बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ पाहणारे आमदार हे मुळात याआधी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आले होते. या लोकांनी भरपूर पैसे देऊन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीची तिकिटे विकत घेतली व ते आमदार झाले. बिहारमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेशप्रसाद सिंह, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हेदेखील पक्षत्याग करू शकतात. या नेत्यांनी नेहमीच पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, असा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले.

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

 

Read in English

Web Title: Nitish Kumar will quit as Bihar CM after 6 months, Tejashwi Yadav will form government: JD(U) MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.