भाजपा नेते एकनाथ खडसे भेटीबाबत खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा, म्हणाले...

By प्रविण मरगळे | Published: October 7, 2020 02:55 PM2020-10-07T14:55:20+5:302020-10-07T14:57:28+5:30

BJP Eknath Khadse, Sharad Pawar News: वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला.

NCP leader Sharad Pawar himself revealed about the meeting of BJP leader Eknath Khadse | भाजपा नेते एकनाथ खडसे भेटीबाबत खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा, म्हणाले...

भाजपा नेते एकनाथ खडसे भेटीबाबत खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा, म्हणाले...

Next
ठळक मुद्देवैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं, मात्र कोणाला भेटायचं अद्याप ठरवलं नाहीखडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढलीगेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या नाराज असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसेंनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती, मात्र त्या बैठकीत त्यांचे समाधान झालं नसल्याने लवकरच तुम्हाला मोठी बातमी देतो असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळपासून एकनाथ खडसे मुंबईत शरद पवारांना भेटणार असं सांगितलं जातं होतं.

याबाबत खुद्द शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसेंबाबत अशी कोणतीही भेट नियोजित नाही, त्यांच्या भेटीबद्दल विनंतीही करण्यात आली नाही, उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आज भेट नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र एकनाथ खडसे आज मुंबईत आहेत, वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आल्याचं खडसेंनी सांगितलं, त्याचसोबत मी लपून छपून कोणाची भेट घेणार नाही, वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला.

पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ: खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी मागणी करीत आहे. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्याने खडसेंशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर हा तरुण नॉट रिचेबल झाला.

क्लिपमधील संवाद

व्हायरल झालेल्या या क्लिपच्या संवादानुसार सदर कार्यकर्त्याने खडसे यांच्याशी संवाद साधला आहे.

रविंद्र भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारीणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.

खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...

देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, यात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली, तेव्हा हा मोठा नेता दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द एकनाथ खडसे आहेत असंही बोललं गेलं, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्याचा स्थानिक राजकीय समीकरणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवारांनी बैठकीत केला होता असं सांगितले गेले, परंतु या बातमीत तथ्य नाही सांगत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावर मौन बाळगलं होतं.

Web Title: NCP leader Sharad Pawar himself revealed about the meeting of BJP leader Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.